रोहा-दिवा मेमुला मिळणार हिरवा कंदील!

रोहा-माणगांव रेल्वेस्थानकांवर अनेक एक्सप्रेसना मिळणार थांबा

खासदार सुनिल तटकरे यांची मध्य रेल्वेकडे आग्रही मागणी

रोहा (रविना मालुसरे) : रोहेकर जनतेची जीवनवाहिनी म्हणजे रोहा-दिवा मेमो रेल्वेसेवा! कोरोना काळात बंद झालेल्या ह्या गाडीमुळे रोहेकरांचे जीवन विस्कळीत झाले आहे. आता सर्व जीवन पुर्वपदावर येत असताना ही गाडी केव्हा सुरू होणार याकडे रोहेकरांचे लक्ष लागले होते. जनतेच्या ह्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तसेच रेल्वेसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली. 

यावेळी त्यांनी दिवा-रोहा (MEMU) ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तसेच रोहा स्थानकावर रोहा-पनवेल, रोहा-दिवा पॅसेंजर यासह नेत्रावती एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, मत्स्यगंधा तसेच मांडवी एक्सप्रेसला व माणगांव स्थानकांवर ओखा एक्सप्रेस, बीकानेर एक्सप्रेस व मरुसागर एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी प्रामुख्याने केली. 

याबद्दल मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अनुकूलता दर्शवली असून रोहा-अष्टमी तसेच निडी खारपडी येथील दोन्ही पूलांच्या कामासाठी तात्काळ निधी देण्याचेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस उपमहाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर, मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. शरद गोयल, महाव्यवस्थापकांचे सचिव श्री. साकेत मिश्रा उपस्थित होते. 

खासदार सुनिल तटकरेंच्या मागणीमुळे रोहा-दिवा मेमु लवकरच सुरू होण्याची शक्यता असुन रोहा स्थानकांत एक्सप्रेस गाड्या थांबणार असल्याने रोहेकरांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Popular posts from this blog