शेडसई ग्रा. पं. च्या ग्रामसभेत ग्रामस्थाला धक्काबुक्की, महिलेसह दोघांविरूद्ध गुन्हा दाखल!
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ म्हणून उपस्थित असलेल्या देवचंद्र धर्मा म्हात्रे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याबद्दल गोफण येथील महिलेसह एकूण तिघांविरूद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेडसई ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू होती. त्यावेळी भागर्तीखार येथील देवचंद्र धर्मा म्हात्रे (वय४०) यांनी उपस्थित सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांना शासनाकडील मंजूर घरकूलांबाबत गावांतील मंजूर यादी मधील ज्या लोकांकडे प्रत्यक्षात पक्की घरे आहेत त्यांचे असेसमेंट उतारे तपासून ज्यांचेकडे घरे नाहीत त्यानाच पात्र ठरवून बाकीच्या लोकांना अपात्र ठरविणे बाबत ठराव करून तशी प्रोसेडींगला नोंद करून त्याची प्रत मला द्यावी अशी विनंती केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या विरोधकांनी देवचंद्र म्हात्रे यांच्या म्हणण्याचा राग येवून त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली व धक्काबुक्कीही केली.
याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात महिलेसह एकूण तिघांविरूद्ध गुन्हा रजि नं. ४२३/२०२१, भा.दं.वि. कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.