नवी मुंबई परिसरात डान्स बार आणि जुगार क्लबचा धुमाकूळ! कायदा-सुव्यवस्थेचे वाजले तीन-तेरा!
बारबालांची छमछम, जुगार क्लब चहुकडे, गेले पोलीस कुणीकडे?
ॲड. काशिनाथ ठाकूर यांच्याकडून कारवाईची मागणी
नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात तुर्भे, एपीएमसी, कोपरखैरणे, तळोजा आणि पनवेल येथील डान्सबार रात्री उशीरापर्यंत राजरोसपणे सुरू असून या परिसरात बेकायदा जुगार क्लब देखील धुमधडाक्यात सुरू असल्यामुळे येथे पोलीसांचे आस्तित्व आहे की नाही? असा सवाल 'प्रहार जनशक्ती' संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केला असून येथील बेकायदेशीररित्या सुरू असणारे डान्स बार आणि त्यांना अभय देणारे पोलीस यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
डान्स बार बरोबरच पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे टायटन बार च्या समोर 'राज सोशल क्लब' नावाचा पत्त्यांचा जुगार क्लब राजरोसपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे कामोठे येथील सेक्टर १४ येथील झिंगाट बारच्या 'समोर विनम्र सोशल क्लब' नावाचा बेकायदा जुगार क्लब सुरू आहे. तसेच, पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी येथे भाजपा कार्यालयासमोर 'साईश्रद्धा क्लब' नावाचा बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू आहे.
तसेच नवी मुंबई मधील एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत सतरा प्लाझा नामक संपूर्ण इमारती मध्ये हॉटेलच्या नावाखाली सर्वाधिक पब, क्लब व हुक्का पार्लर नवी मुंबई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या कृपाछत्राखाली धुमडक्यात सुरु असते. शहराच्या कानाकोपऱ्यातील तरुणाईचे पावले अशा क्लबच्या ठिकाणी वळत आहेत. परिणामी हे अवैध धंदे आणि त्यांना अभय देणारे पोलीस यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.