पदाचा दुरूपयोग करणाऱ्या माणगांव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
माणगांव (प्रतिनिधी) : माणगांव येथील भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर ह्या आपल्या पदाचा दुरूपयोग करून बेकायदेशीररित्या भूसंपादनाचा मोबदला अदा करीत असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्याविरूद्ध जनसेवा संघटनेचे अध्यक्ष ॲड. अनिकेत काशिनाथ ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ॲड. अनिकेत काशिनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य सचिव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल आयुक्त, कोकण विभाग यांनी ॲडीशनल जिल्हाधिकारी यांच्याकडून उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची चौकशी करून अहवाल सादर करावा असा आदेश दिला. परंतु अद्यापही उपविभागीय अधिकारी ह्या पदाचा दुरूपयोग करून तसेच भूमाफीयांशी संगनमत करून भूसंपादनाचा मोबदला बेकायदेशीररित्या अदा करीत आहेत. त्यामुळे जनसेवा संघटनेचे अध्यक्ष ॲड. अनिकेत काशिनाथ ठाकूर यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी मुंबई उच्च न्यायालयात उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्याकडून भूसंपादन अधिकारी म्हणून असलेले अधिकार काढून घेण्यात यावेत आणि त्यांची खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना निलंबीत करण्यात यावे अशी ॲड. अनिकेत काशिनाथ ठाकूर यांची मागणी आहे. तसेच, येणाऱ्या कालावधीत सक्षम न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल येणार असल्याचेही ॲड. अनिकेत काशिनाथ ठाकूर यांनी सांगितले.