श्री धावीर महाराज देवस्थानाच्या जागेवरील सीमाशुल्क विभागाचे आरक्षण हटवून ती जागा पुन्हा देवस्थानास देण्याबाबत सीमा शुल्क विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद
खासदार सुनिल तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
अलिबाग (जिमाका) : श्री धावीर महाराज मंदिर हे जिल्ह्यातील रोहा शहरातील काही महत्वपूर्ण देवस्थानांपैकी एक असून त्यास सुमारे १७५ वर्षांहून अधिक प्राचीन परंपरा तसेच गौरवशाली इतिहास लाभला आहे. येथे येणारे सर्व लोक धर्म, जात, लिंग आणि पंथ यांचा विचार न करता या मंदिराला आपले श्रद्धास्थान मानतात. संपूर्ण भारतात, केवळ दोनच मंदिरे अशी आहेत, जिथे देवतांना राज्यातील पोलिस दलाकडून सशस्त्र "गार्ड ऑफ ऑनर" दिले जाते आणि श्री धावीर महाराज मंदिर देवस्थान हे त्यापैकी एक आहे, ही रायगडवासियांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
मात्र श्री धावीर महाराज देवस्थानाच्या जागेवर सीमाशुल्क विभागाचे आरक्षण लागू झाले होते. या आरक्षणानंतर, आज ४० वर्षांहून अधिकचा काळ ओलांडला आहे, परंतु या जागेचा सीमाशुल्क विभागाद्वारे कोणत्याही प्रकारचा वापर केला गेला नाही. त्यामुळे ही जागा पुन्हा श्री धावीर महाराज देवस्थानास मिळावी, याकरिता खासदार सुनिल तटकरे यांनी सीमाशुल्क विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला व ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती सीमाशुल्क विभागाला केली.
यानुषंगाने दि.१४ ऑक्टोबर २०२१ रोजी खा.सुनिल तटकरे यांच्यासमवेत सीमाशुल्क आयुक्त व इतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सीमाशुल्क आयुक्तांनी ही जागा पुन्हा श्री.धावीर महाराज देवस्थान ट्रस्टला देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
लवकरच ही कार्यवाही पूर्ण होईल, असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे.