राष्ट्रवादी युवक मेळाव्याची रोह्यात जय्यत तयारी
तालुका युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे सहकाऱ्यांसह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सज्ज
रोहा (रविना मालुसरे) : रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळाव्याचे रविवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता रोहा येथे आयोजन करण्यात आले आहे. रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या जिल्हा युवक मेळाव्याची, पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे आपल्या सहकाऱ्यांसमवेत जोरदार तयारी करीत आहेत. रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या युवक पदाधिकार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मावळचे दमदार आमदार सुनिल अण्णा शेळके व लोकनेते आमदार निलेश लंके यांची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करून निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा मूलमंत्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याकडून खासदार सुनील तटकरे यांनी आत्मसात केलेला आहे. अनिकेत तटकरे,आदिती तटकरे,निलेश लंके,सुनिल शेळके ही तरुण आमदार मंडळी ज्येष्ठांच्या पावलावर पाऊल ठेवून विधानभवनात आपला ठसा उमटवताना दिसत आहे. नव्या दमाच्या नेतृत्वाचा पक्षसंघटने साठी खूप चांगला उपयोग होत आहे.ह्या अभुतपूर्व पर्वणीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील तरुण उत्सुक असून राष्ट्रवादीच्या जिल्हा मेळाव्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
रोहा नगरपालिकेच्या पार्किंग मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे. रोहा तालुक्याच्या विविध भागात जाऊन ते तरुणांना आवाहन करीत आहेत. सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त ते विवीध कार्यक्रमांना भेटी देत असून मेळाव्याच्या आयोजनाबाबत तरुणांची मते जाणुन घेत आहेत.
एकंदरीत ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुणांच्या मेहनतीने साकारणारा हा अभुतपुर्व युवक मेळावा यशस्वी होणार हे निश्चीत आहे.