...अखेर चिमुकल्या रुद्रचा मृतदेह सापडला, बाळ जिवंत सापडेल ही शेवटची आशा मावळली. गुजरातेत जाऊन नराधमाच्या मुसक्या आवळल्या. माथेफिरुच्या कृत्याने माणगांवसह रोहे तालुका हादरला
घटनेचा छडा लावण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरेंचा पाठपुरावा
रोहा (रविना मालुसरे) : कु. रुद्र अरुण यादव, वय ३ वर्षे ह्या माणगांव तालुक्यातील बोर्ले येथील निरागस-निष्पाप बालकाचे अपहरण झाल्याची घटना नुकतेच समोर आली होती.त्याच गावातील नराधम आरोपी संतोष अशोक यादव याने हे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र तपासात काही प्रगती होत नव्हती अखेर माणगांवचे राष्ट्रवादी नेते सुभाष केकाणे व युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे यांनी पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांची भेट घेतली. त्यांनी पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांना ह्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे तपासाची चक्रे वेगात फिरु लागली.निष्पाप बालक जिवंत सापडेल ह्या दुर्दम्य आशेने तपास सुरू होता. तिकडे गुजरात राज्यातील वापी येथे पळून गेलेल्या नराधम आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रुद्रचा शोध सुरू झाला.
रोहा-मुरुड रस्त्यावर खारी ते कुंभोशी दरम्यान शेकडो नागरिक पोलिसांच्या सोबतीने रुद्रचा शोध घेत होते.खाजण जमीन,वाढलेले गवत तर कुठे काटेकुटे.मात्र कशाचीही तमा न करता रुद्र जिवंत सापडेल ह्या आशेवर सर्वजण शोध घेत होते. मात्र रुद्रचा मृतदेह सापडल्यामुळे शेवटच्या आशेवर पाणी फेरले गेले.क्रुरकर्मा संतोष यादव याने केलेल्या ह्या भीषण कृत्याने माणुसकीला काळीमा फासला गेला.रोहा तालुक्यातील आरे खुर्द,आरे बुद्रुक व खारगाव ग्रामस्थांनी रुद्रला शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
हि घटना प्रथम दर्शनी कौटुंबिक वादातुन घडल्याचे दिसत असले तरी अशा अमानुष घटनेचा खोलात जाऊन तपास होणे गरजेचे आहे.आरोपी रोह्यातचा का आला?त्याच्या कृत्याची पुर्वकल्पना कोणाला होती का?गुन्हा घडण्यापुर्वी,पलायन केल्या नंतर तो कोणाच्या संपर्कात होता हे त्याचे काॕल डिटेल्स,वाॕटसअप चॕट व त्याचे लोकेशन तपासून शोध घेणे गरजेचे आहे.एवढे निर्घृण कृत्य करणारा माणुस रोह्यात कोणाला व का भेटला?हा व असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.पोलिसांनी सखोल तपास करुन सत्य जनतेसमोर मांडावे अशी मागणी आता समाजातुन होत आहे.कु.रुद्रचा जीव परत येणार नसला तरी आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे,जेणे करुन अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.