गिरणे येथे मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 चे वाटप

तळा (संजय रिकामे) : हे वर्ष भारतीय स्वातंत्र्यदिनाचे अमृत महोत्सवी वर्ष "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" म्हणून साजरे करण्यात येत आहे. 

या निमित्ताने जनतेला वैशिष्ट्यपूर्ण विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विभागांमध्ये विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर  "शेतकऱ्यांना मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 वाटप" या उपक्रमाचा शुभारंभ करून तळा तालुक्यातील गिरणे येथे संगणकीकृत गा. न. नं 7/12 चे वाटप करण्यात आले. 

सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते खातेदारांना 7/12 चे वाटप केले. 

मौजे गिरणे येथे उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर व तहसिलदार श्री.कनशेट्टी  यांच्या उपस्थितीत गिरणे ग्रामपंचायत सरपंच सौ.ज्योती कैलास पायगुडे यांच्या हस्ते संगणकीकृत 7/12 चे वाटप करण्यात आले.

जनतेने आपल्या अधिकारांबाबत जागरूक होऊन विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर   यांनी यावेळी उपस्थितांना केले.

तळा तहसिलदार श्री. कनशेट्टी यांनी सर्व खातेदारांना ई पिक पाहणी अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले.

तळा तहसिल कार्यालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सुनियोजित आखणी करून संगणकीकृत 7/12 वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ यशस्वीपणे केला असून तळा तालुक्यातील सर्व खातेदारांना लवकरात लवकर संगणकीकृत 7/12 चे वाटप करण्यात येईल. याकरिता जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर  यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे तहसिलदार कनशेट्टी यांनी सांगितले. 

यावेळी संबंधित प्रांत, तहसिल, पंचायत समिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog