जिल्ह्यातील महिलांसाठी कोव्हीड-19 विशेष लसीकरण मोहीम
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा पुढाकार
रोहा (रविना मालुसरे) : नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून रायगड जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्व महिलांसाठी सोमवार, दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजी "कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम" राबविण्यात येणार आहे.
या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते सर्व नियोजन केले असून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हे संपूर्ण जिल्ह्यात होणारी ही विशेष लसीकरण मोहीम यशस्वी होईल यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहेत.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केल्याने महिलांचे जीवन अधिक सुरक्षित करणे व त्यांचे लसीकरणाचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी "फक्त महिलांसाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय कोरोना लसीकरण केंद्रावर सोमवार, दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजी केवळ महिलांचे लसीकरण ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. कु. आदिती तटकरे आणि जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील महिलांना केले आहे.