कृषी विभागातर्फे हापूस आंबा उत्पादक व विक्रेते यांनी त्यांची नोंदणी करण्याचे आवाहन
रोहा (समीर बामुगडे) : रायगड जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक व विक्रेते शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन (GI Patent) मिळालेले आहे व त्या अनुषंगाने सर्व हापूस आंबा उत्पादक व विक्रेते यांनी त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे.
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोंदणी रत्नागिरी येथील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रते सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या ऑफिसमध्ये करायचे आहे. परंतु रायगड मधील शेतकऱ्यांना रत्नागिरी पर्यंत जायचा त्रास होऊ नये म्हणून रायगड जिल्हा कृषी अधीक्षक बानखेळे मॅडम यांनी पुढाकार घेऊन कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित यांचे पदाधिकारी याना रायगड जिल्ह्यातील जिल्हा कृषी कार्यालय येथे ९ फेब्रुवारी या दिवशी बोलाऊन सुमारे ९७ शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे तरी सुद्धा अनेक शेतकरी याचा फायदा घेऊ शकले नाहीत अशा शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० पासून
रोहा तालुका कृषी कार्यलयात शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी लागणारे फॉर्म भरून घेऊन संपूर्ण प्रक्रिया जाग्यावर करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सौ. बाणखेळे मॅडम व संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे, संचालक डॉ. अर्चना पाटील व डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिले आहे.
सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी खालील कागदपत्रे सोबत आणावीत...
त्यांच्या हापूस आंबा लागवड असलेल्या जमिनीचे ७/१२ चे उतारे (मागील ३ महिन्यातील चालतील)
बागेच्या जमिनीचा नकाशा ( मूळ अभिलेखाची झेरॉक्स ज्यावर बागेतील कलमांची संख्या विहीर किंवा बोरवेल, घर, वीज जोडणी यांपैकी जे असेल ते हाताने नोंद करून चालेल किंवा पूर्ण हाताने काढलेला पण चालेल ) वोटिंग (इलेक्शन) कार्डची झेरॉक्स किंवा ड्रायव्हींग लायसन्सची झेरॉक्स, १ फोटो, २०१० रुपये चा संस्थेच्या नावाने चेक (कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित) किंवा रोख रक्कम घेऊन कृषी तालुका कार्यालय रोहा येथे २४ सप्टेंबर रोजी हजर राहावे. अलिबाग, पेण, रोहा व मुरुड येथील शेतकऱ्यांनी सकाळी ९.३० ते ११.३० पर्यंत यावे.
यावेळी डॉ. भिडे व जिल्हा कृषी अधीक्षक सौ. बाणखेळे मॅडम शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा कृषी कार्यालय व डॉ. संदेश पाटील (9158752426), सुरेंद्र भंडारी (9423377038), डॉ. जगन्नाथ पाटील (9823436871), वरूण पाटील (9922766555) यांच्याशी संपर्क साधावा.