रायगड जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय, ता. माणगाव, जि.रायगड या विद्यालयात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यावर्षी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समितीद्वारा प्राप्त झाली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती https://cbseitms.nic.in/registrationClass6/registrationClass6 व http://www.navodaya.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रवेश अर्ज निःशुल्क ऑनलाईन भरण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालकांनी नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेऊन इंटरनेटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. हा अर्ज भरत असताना पालकांची सही विद्यार्थ्यांची सही, फोटो आवश्यक आहे.
सहावीसाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षेस बसणारा विद्यार्थी सलग तिसरी व चौथी पास असावा. पाचवीत संपूर्ण वर्ष रायगड जिल्हयात शिकणारा असावा. त्याचा जन्म 1 मे 2009 ते 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस पकडून) पर्यंतच असावा.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक 30 नोव्हेंबर 2021 असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. ही परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे.
अधिक माहितीसाठी (संतोष चिंचकर : 9881351601), (कैलाश वाघ : 9527256185) व (अण्णासाहेब पाटील : 9960582046) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य श्री. किरण इंगळे यांनी केले आहे.