रोठ खुर्द ग्रामपंचायतीत विकासकामांमध्ये भ्रष्टाचार?
गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
धाटाव/रोहा (किरण मोरे) : रोठ खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीत भ्रष्टाचाराचे तांडव सुरू असून इथे तर प्रत्येक विकासकामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रोहा तालुका अध्यक्ष किरण मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरे यांनी गटविकास अधिकारी, रोहा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
रोठ खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीत अंतर्गत गटार लाईनचे काम झालेले आहे; परंतु या कामामध्ये इस्टिमेंट प्रमाणे काम न करता जुने पाईप वापरून वाढीव दराने पैशाचा अपहार करण्यात आला आहे. तसेच वाघेश्वर नगर आणि रोठ खुर्द येथे एकूण दोन अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आलेले आहे; परंतु हे काम देखील इस्टिमेंट प्रमाणे करण्यात आलेले नाही.
एम.आय.डी.सी. मार्फत रोठ खुर्द ग्रामपंचायत हद्दीत शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू आहे, पण तरीही गेल्या ३ महिन्यांपासून पाणी शुद्धीकरणाकरिता टी.सी.एल. पावडरवर एक लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे ही पावडर कुठेही वापरण्यात आलेली नाही. अशा प्रकारे या बोगस कामांची बोगस बिले काढून रोठ खुर्द ग्रामपंचायतीने शासनाची फसवणूक केली आहे. सदरची बोगस बिले काढण्यासाठी रोहा पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ अभियंता श्री. जुजगार हे त्यांना साथ देत आहेत.
याप्रकरणी वारंवार तक्रारी करून देखील रोहा पंचायत समिती कार्यालयातून बोगस कामांची बोगस बिले काढली जात आहेत. परिणामी या कनिष्ठ अभियंत्याचीही चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रोहा तालुका अध्यक्ष किरण मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरे यांनी केली आहे.