वारसा परंपरेचा, सण गौराईचा, सुवासिनींच्या आनंदाचा
रोहा (समीर बामुगडे) : गणरायाचे आगमन घराघरात मंगलमय वातावरणामध्ये झाले आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र नवचैतन्य पसरले आहे, अशातच गणरायाच्या पाठोपाठ येणाऱ्या गौराईमातेच्या आगमनाची महिला वर्गाला उत्सुकता लागलेली असते.
गौरीचा सण हा आगरी-कोळी महिलांसाठी एक वेगळा उत्साह वाढवणार सण असतो. प्रत्येक सुवासिनीला माहेरून सुप (ओवसा) दिला जातो, सुप हा बांबू पासून तयार केला जातो त्या मध्ये फळ, मिठाई, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून सुप भरला जातो व तो सुप गौरी पुढे ओवसला जातो. आपल्या पतीच्या व कुटुंबाच्या सुख-समृद्धी साठी गौराई मातेला साकडं घातलं जात.ग्रामीण भागातील महिला आपल्या परंपरे नुसार गौरी मातेला विनंती करतात (आई गौरी येतच जा, तुला ओवसा देतच जा, मला बांबूच्या कांबी चा, तुला सोन्या सुवर्णाचा) अशा प्रकारे गौराईला साकडे घातले जाते.
गौरीच्या आगमनाने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले असते. ठीकठिकाणी वेगवेगळ्या परंपरेने गौरीचे पूजन केले जाते. नैवेदे म्हणून खीर, पोळी, घावन केले जातात. गौरी पूजना नंतर दुसऱ्या दिवशी गणराया सोबत गौरी मातेचे विसर्जन केले जाते. कोरोनाच्या पार्शवभूमीवर ग्रामीण भागातही शासनाच्या नियमांचे पालन करून सणांचा वारसा जोपसला जातो.