कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रोहा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांकडून एक हात मदतीचा
नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधक उपचार साहित्याचे लोकार्पण संपन्न
प्राथमिक शिक्षकांच्या दातृत्वाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
रोहा (रविना मालुसरे) : रोहा पंचायत समितीच्या द. ग. तटकरे सभागृहामध्ये दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी रोहा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांकडून देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपचार साहित्याचे लोकार्पण पालकमंत्री नामदार आदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कोरोना काळात शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा विशेषत्वाने उल्लेख केला. प्राथमिक शिक्षक हे सर्वच आघाड्यांवर लढा देत असताना अग्रेसर असतात. शासनाच्या विविध योजना, उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्राथमिक शिक्षक महत्त्वाची भुमिका बजावतात. कोरोना काळात शाळा बंद होत्या, मात्र शिक्षकांचे काम अहोरात्र सुरू होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिक्षकांनी उत्तम सेवा बजावली. तर ह्याच काळात शिक्षक कॉरंटाइन सेंटरमध्ये, तपासणी नाक्यावर विविध भुमिकेतून काम करीत होते. शासनाच्या "माझे गाव माझे कुटुंब" या मोहिमेत तर शिक्षकांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करुन कोरोनावाढीचे मूळ शोधून कोरोनाचा अटकाव केला. कोरोना काळात ही ज्ञानवाहिनी जणू आरोग्यवाहिनी मध्ये रुपांतरीत झाली होती.
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नसला तरी मोबाईलचा कल्पकतेने वापर करून शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा फंडा आत्मसात करून शिक्षण घराघरात पोहोचले. अशा शिक्षकांच्या समाजाप्रती सेवावृत्ती कार्याने आपण भारावून गेल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.
रोहा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी समाजासाठी आपले उत्तरदायित्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी प्राथमिक शिक्षकांकडून होणारे काम हे उल्लेखनीय म्हणावे लागेल. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून जवळपास तीन लाख रुपयांचे आरोग्य साहित्य रोहा तालुक्यातील शिक्षकांनी मोफत देऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पुढील काळात शासनस्तरावर तसेच व्यक्तिगत पातळीवर आपण प्राथमिक शिक्षकांना सहकार्य करू असेही त्यांनी सूचित केले.
पंचायत समिती विविध विभाग, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्र व उपजिल्हा रुग्णालय रोहा येथील अधिकाऱ्यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासमवेत व्यासपीठावर विजयराव मोरे, उपसभापती रामचंद्र सकपाळ, राजश्री पोकळे, राजेंद्र पोकळे, प्रितम पाटील, तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, पंडित राठोड, गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे, आरोग्य अधिकारी डॉ. अभय ससाणे तसेच विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक निमंत्रित शिक्षण समिती सदस्य अजय कापसे यांनी केले. सुत्रसंचलन जयेश भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील शिक्षकांनी मेहनत घेतली.