अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या नावाने पैशाची मागणी झाल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा

अलिबाग (जिमाका) : अन्न व औषध प्रशासन हे कार्यालय दूरध्वनीद्वारे कोणत्याही औषध दुकानदारास तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या सूचना देत नाही. अन्न व औषध प्रशासनास तक्रार प्राप्त झाल्यास रितसर औषध निरीक्षक किंवा अन्न सुरक्षा अधिकारी औषध दुकानात प्रत्यक्ष भेट देवून संबंधित तक्रारीबाबत प्रत्यक्ष चौकशी करतात, अशी या कार्यालयाच्या कार्यपध्दती असल्याचे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कळविले आहे. 
मे. जलाराम मेडिकल स्टोअर्स, पेण यांची अन्न व औषध विभागाकडून फोनवर बोलत आहे असे सांगून अज्ञात व्यक्तीने पैशाची मागणी केली होती. तसेच खोपोली व रोहा येथेही औषध दुकानदाराबाबत दूरध्वनीद्वारे अज्ञात व्यक्तीने पैशाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पेण येथील पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर 0202 दि. 05 सप्टेंबर 2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याचप्रमाणे उलवे येथील दुकानदारांचीही फसवणूक केल्याची बाब निदर्शनास आली व त्याबाबत न्हावा-शेवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर क्र. 0146 दि. 24 सप्टेंबर 2021  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळे दूरध्वनीद्वारे संपर्क केलेल्या कोणत्याही व्यक्तीवर औषध दुकानदारांनी विश्वास ठेवू नये.  याबाबत कोणत्याही औषध दुकानदारास काही शंका/अडचण असल्यास सहायक आयुक्त (दूरध्वनी क्र.0243-252084, भ्रमणध्वनी क्रमांक 9987335710) वर संपर्क साधून शंका निरसन करून घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन रायगड-पेण दस्तगीर शेख यांनी केले आहे.

Popular posts from this blog