कोलाडमध्ये बेकायदा मटका-जुगाराच्या अड्ड्यावर पोलीसांची धाड!
मुद्देमाल जप्त, मटका चालकावर गुन्हा दाखल
कोलाडमध्ये कायमस्वरूपी मटका बंद राहणार : पोलीसांची प्रतिक्रीया
कोलाड (प्रतिनिधी) : कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदा मटका-जुगाराच्या अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून मुद्देमाल जप्त केला व मटका चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या परिसरात मटका-जुगार व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद राहतील अशी प्रतिक्रीया कोलाड पोलीसांनी दिल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे तर धाबेच दणाणले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलीसांचे कौतुक केले जात आहे.
कोलाड परिसरातील पदमावती नगर येथील तलाठी ऑफीसलगत डांबरी रोडवरील वळणावर 'कल्याण' नावाचा बेकायदा मटका-जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी आपल्या पोलीस पथकासह याठिकाणी धाड टाकून याठिकाणी मटका-जुगार चिठ्ठ्यांचा बंच, इतर मुद्देमाल व रोख रक्कम जप्त केली. तसेच या परिसरात मटका-जुगार व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद राहतील अशी प्रतिक्रीया कोलाड पोलीसांनी दिल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे तर धाबेच दणाणले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोलाड पोलीसांच्या या धडक कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७८/२०२१, महाराष्ट्र जुगार अधिनियम १८६७ चे कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. ए. विघ्ने हे पुढील तपास करीत आहेत.