रोहा तालुका सिटीझन फोरमच्या मागणीला यश, खासदार सुनिल तटकरेंच्या प्रयत्नांनी तब्बल अडीच वर्षांनी रोह्यासाठी पूर्णवेळ भूमी अभिलेख अधिकारी नियुक्त 

कार्यालयातील दलाल व कर्मचाऱ्यांची युती तोडण्याचे मोठे आव्हान

रोहा (रविना मालुसरे) : उपअधिक्षक भूमी अभिलेख रोहा ह्या पदाचा कार्यभार गेली अडीच वर्षे अन्य प्रतिनियुक्त अधिकारी सांभाळत होते. सक्षम अधिकारी सदरच्या पदावर नियुक्त नसल्यामुळे कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख यांनी हा संवेदनशील विषय खासदार सुनिल तटकरें यांना अवगत केला. नागरिकांचे हित लक्षात घेऊन खासदार सुनिल तटकरे यांनी रोह्याला पूर्णवेळ तालुका भूमी अभिलेख अधिकारी नियुक्तीसाठी सुत्र हलविली.

अखेर खासदार सुनिल तटकरेंच्या प्रयत्नांनी व सिटिजन फोरमच्या पाठपुराव्याने रोहयाला तब्बल अडीच वर्षांनी पुर्णवेळ उपअधिक्षक भूमी अभिलेख अधिकारी नियुक्त करण्यात आला. यामुळे शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या आगमनाने टिएलआर कार्यालयातील गैरप्रकारांना आळा बसेल अशी किमान अपेक्षा बाळगली जात आहे. 

शासकीय जमीन मोजणीला विलंब लावून, शेतकरीवर्गाला खाजगी मोजणी करण्यास प्रवृत्त करून पुढे तीच मोजणी सरकारी मोजणी दाखविण्याचा अफलातुन प्रकार सध्या सुरू आहे. विशेष बाब म्हणजे ह्याची सर्व सूत्र कार्यालयातून हलविली जातात. शासनाचा महसुल बुडवून, केवळ वैयक्तीक फायद्यासाठी काम करणारे हे झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांना शासकीय काम करायला लावणे हे सर्वात मोठे आव्हानात्मक काम नूतन आधिकारीवर्गाला करावे लागणार आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार असल्याचा अनुभव आजवर अनेकांनी घेतला आहे. रोहेकर नागरिकांची हि दुखरी बाजू रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा तथा प्रदीप देशमुख यांनी  खासदार सुनिल तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. खासदार सुनिल तटकरे यांनी जनभावना लक्षात घेऊन तातडीने पूर्णवेळ तालुका भूमी उपअधिक्षक म्हणून नंदकुमार माळवे यांच्यावर रोह्याची जबाबदारी जोपावली आहे. याबद्दल रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा तथा प्रदीप देशमुख यांनी खासदार  सुनिल तटकरे यांचे आभार मानले. गुरुवारी आप्पा देशमुख यांच्यासह फोरमच्या शिष्ठमंडळाने नवनियुक्त टीएलआर नंदकुमार माळवे यांची भेट घेऊन त्याचे स्वागत केले. यावेळी रोहा तालुका सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, प्रशांत देशमुख, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे, राजेंद्र जाधव, रविंद्र कान्हेकर, रविना मालुसरे, वरसे उपसरपंच मनोहर सुर्वे, मिलींद अष्टीवकर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी श्री. नंदकुमार माळवे यांना सद्यस्थितीबाबत अवगत केले.कार्यालयातील कर्मचारी कोण? व दलाल कोण? हे सामान्य नागरिकांना समजणे अवघड जात आहे. हे चित्र आपण बदलावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तर नंदकुमार माळवे यांनी टी.एल.आर कार्यालयाचे कामकाज लोकाभिमुख करण्याचे आश्वासन दिले.

Popular posts from this blog