पत्नीने ऊस तोडणीच्या कामासाठी जाण्यास नकार दिला म्हणून पतीने केला तिचा खून!
रायगड (भिवा पवार) : पत्नीने ऊसतोडणीच्या कामासाठी जाण्यास नकार दिल्याने त्याचे पर्यावसन भांडणात झाल्याने पतीने पत्नीस लाथा-बुक्क्यांनी आणि डोक्यास मारहाण केली. मारहाणीमध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबिवली आदिवासीवाडी येथे घडली. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीसांनी कसून तपास केला असता, घटनास्थळापासून आसपासच्या जंगलामध्ये फरार झाला होता. तो जंगलात एका झाडावर चढून बसलेल्या स्थितीत पोलीसांना आढळून आला. त्या झाडावर चढून त्याच्या मुसक्या आवळण्यात कोलाड पोलीसांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 31ऑगस्ट रोजी रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबिवली आदिवासी वाडी येथील आरोपी चंदर सुदाम वाघमारे (वय 41 वर्षे) याने आपली पत्नी ऊसतोडणीच्या कामासाठी धंद्यावर जाण्यावरून भांडण झाली. यामध्ये आरोपीने पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये तिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र त्यानंतर आरोपी फरार झाला होता. सदर आरोपी चंदर सुदाम वाघमारे हा जंगलात लपून बसला होता.
आरोपीचा मोबाईल, आधारकार्ड नसतानाही अधिकारी अंमलदार यांनी गुन्हा झाल्यापासून घटनास्थळ व आसपासच्या जंगलात एका झाडावर लपून बसलेल्या आरोपीस शिताफीने अटक केली असून कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव व त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी तसेच कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मयताची पाहणी केली तसेच साक्षीदारांची विचारपूस केली.
या घटनेची पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजि. नं. 007/2021, भा.दं.वि. कलम 302 अन्वये नोंद झाली असून अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या आदिवासी रोजगारबाबत शून्य नियोजनामुळे आदिवासी महिलेचा बळी : शशिकांत जगताप
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण रायगड दरवर्षी आदिवासींच्या विकासासाठी रोजगारासाठी करोडो रुपये खर्च करीत असतात, मात्र ह्या करोडो रुपये रोजगाराच्या मूळ योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नसून त्या कागदावरच थांबून राहत असल्याची खंत येथील पदवीधर आदिवासी युवक शशिकांत जगताप यांनी व्यक्त केली असून आदिवासी समाजाला रोजगार दिला तर परजिल्ह्यात ऊस तोडणीसाठी अथवा कोळसा भट्टीसाठी आदिवासी जाणार नाहीत! त्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प खात्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करून आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात व प्रयत्न करावेत अशी मागणी आदिवासी कार्यकर्ते शशिकांत जगताप यांनी केली असून जर स्थानिक आदिवासींना या जिल्ह्यातच रोजगार निर्मिती उपलब्ध झाल्यास असे प्रकार घडणार नाहीत असेही ते म्हणाले!