मालसई येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना कार्यशाळा संपन्न
रोहा (रविना मालुसरे) : बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी मालसई, ता. रोहा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रीया उद्योग योजनेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महिला सक्षमीकरणासाठी ही योजना कशा लाभदायक आहे याचे मार्गदर्शन या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना केले.
महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपला छोटा उद्योग उभा करावा व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे. तसेच महिला बचत गट व महिला समुहाने एकत्रित संघटित होऊन काम करणे गरजेचे आहे. शासन आपणास हातभार लावण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करित आहे. आपण त्यांचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक श्री. दिगंबर साळे यांनी केले. श्री. सुतार यांनी या योजनांची चांगल्या प्रकारे माहिती उपस्थित महिलांना दिली.
यावेळी पत्रकार रविना मालुसरे यांनी मालसई मधील महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक दिगंबर साळे, श्री. सुतार व पल्लवी उबाळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका मालुसरे तसेच मालसई मधील महिला बचत गटांच्या पदाधिकारी, महिला मंडळाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.