शिहू येथे रिलायन्सतर्फे लसीकरण सुरु
नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : शिहू ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड नागोठणे तर्फे कोविड-१९ लसीकरण दि. १९ सप्टेंबर रोजी प्राथमिक शाळा शिहू व ग्रामपंचायत कार्यालय शिहू येथे मोफत सुरु करण्यात आले आहे.
शिहू ग्रामपंचायत ही लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असून ४ गावे व २ आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहू नये म्हणून ही मोहीम राबवत असल्याचे प्रतिपादन रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आदिवासी वड्यांवरील अति दुर्गम भागातील व खेडोपाड्यातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याकडे अधिक लक्ष केंद्रित करून वरवठणे ते शिहू रिलायन्स कंपनी परिसरातील नागरिकांचे १००% लसीकरण करण्यासाठी रिलायन्स प्रशासन प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन केले.
या लसीकरण मोहिमेसाठी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड नागोठणेचे वरिष्ठ अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, अध्यक्ष शशांक गोयल, उपाध्यक्ष चेतन वाळंज, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, (कॉर्पोरेट अफेअर्स) डॉ. प्रशांत बारदोलाई आणि टीमचे ग्रामपंचायत सरपंच पल्लवी भोईर, युवा नेते प्रसाद भोईर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी आभार मानले.
कोविड कालावधीमध्ये रिलायन्सने सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.