वडिलोपार्जित परंपरा लाभलेला पाटणूसचा गणपती कारखाना
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : निसर्ग रम्य सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले माणगाव तालुक्यातील पाटणूस हे गाव. आज देवकुंड पर्यटनामुळे प्रसिध्द झाले असले तरी तालुक्यापासून 28 कि. मि. आत असल्यामुळे पुरातन काळी दळण वळणाची फार मोठी समस्या या गावाला भेडसावत असे. तरीही अगदी पुरातन काळापासून या गावात गणपतीचा कारखाना आहे.
श्री. श्रीपाद हरिशचंद्र म्हामुणकर पाटणूस गावी गेली 40 वर्ष शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. गत वर्षी पर्यंत ते एसटी आगार रोहा येथे MSRTC मध्ये नोकरी करीत होते. 2020 मध्ये ते सेवा निवृत्त झाले. इतकी वर्षे ते नोकरी सांभाळून गणपती मूर्ती घडविण्याचे काम अविरत पणे करीत होते आणि आजही ते चालू आहे!
गणपती मूर्ती बनवण्याची परंपराच त्यांच्या घराण्याला लाभली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांच्या आधी त्यांचे धाकटे काका कै. भास्कर अनंत म्हामुणकर आणि त्यांच्या आधी त्यांचे थोरले काका कै. गजानन अनंत म्हामुणकर हे मूर्ती बनविण्याचे काम करीत होते. त्यांच्या काळी गावातील गणपतीचा माळ या जागेवरून माती आणून त्या पासून मूर्ती बनविल्या जात. नंतर शाडू माती उपलब्ध होऊ लागली. तेंव्हा पासून शाडू मातीच्या मुर्त्या घडविणे चालू झाले.
ते पाटणूस पंचक्रोशीत वर्षानुवर्षे जोडले गेलेल्या ग्रामस्थांसाठी मुर्त्या बनविण्याचे काम करीत आहेत. काही मुर्त्या साचेबद्ध असतात तर काही मुर्त्या ते लोकांच्या सांगण्यानुसार हाताने घडवितात. त्यांचे माती काम अंदाजे मे अखेर सुरू होते आणि गणेश चतुर्थीच्या 4-5 दिवस आधी काम संपते. त्यानंतर ग्रामस्थ मुर्त्या घेऊन जायला सुरुवात करतात.
गावातील काही लोकांना मोठी मूर्ती हवी असते त्यामुळे त्यांनी बऱ्याजदा यांच्या जवळ प्लास्टर ऑफ पॅरिस (पी.ओ.पी.)च्या मूर्ती बनविण्याबाबत किंवा बाहेरून मुर्त्या आणण्यासाठी बाबद आग्रह केला परंतु श्रीपाद म्हामुणकर यांच्या मते प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीचे विघटन होत नाही व त्या मूर्तीचे अवशेष तुटून बऱ्याचदा नदी काठावर येतात किंवा पाण्यात बरेच महिने पडून राहतात. हे आपल्या सणाचे आणि दैवतांचे विडंबन आहे मात्र मातीची मूर्ती काही वेळातच पाण्यात विरघळून जाते आणि खऱ्या अर्थाने मूर्तीचे विसर्जन होते. त्यामुळे त्यांनी कधीही प्लास्टर (पी.ओ.पी.) चे समर्थन केले नाही. मातीच्या मूर्ती बाबत कायम अग्रही राहिले. आणि आज प्रशासनानेच प्लास्टर (पी.ओ.पी.) च्या मुर्त्यांवर बंदी आणल्याने त्यांना खऱ्या अर्थाने समाधान वाटत आहे.