एकाच कामाचे दोनदा भूमिपुजन; भानंग गावाला लाभले भाग्य! 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेय वादाची लढाई

तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यात भानंग गावामध्ये पाणी पुरवठा योजनेचे 24 तासाच्या आत दोनदा भूमिपुजन झाल्याने तळा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. भानंग गावातील पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर शिवसेनेने या कामाचे भुमीपुजन मंगळवार (दि.13) रोजी सकाळी 12.वा केले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पुन्हा त्याच कामाचे भुमीपुजन सायं 5 वाजता केले असल्याने तळा तालुक्यात श्रेयवादाची चर्चा रंगली आहे. 

भानंग ग्रामस्थ यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वेळा राजिप महिला बालकल्याण सभापती सौ. गीता जाधव यांची भेट घेतली त्यांच्या मागणीचा विचार करुन आम्ही भानंग पाणी पुरवठा योजना आराखड्यात मंजुर करुन आणली ग्रामीण पाणीपुरवठा जल जीवन मिशनच्या अध्यक्षा या पालकमंत्री अदिती तटकरे आहेत त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली भानंग आणि वावे मांद्रज येथील योजना आम्ही मंजूर करुन आणल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड. उत्तम जाधव यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, उद्योग आणि खनिकर्म पर्यटन फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहीती व जनसंपर्क विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड ना. अदिती तटकरे  यांच्या हस्ते भानंग येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन हा शासकीय दौरा होता आम्ही लपुन छपून भूमीपुजन करत नाहीत. पालकमंत्री येणार असल्याचे समजतात घाईने जाणीवपूर्वक शिवसेना पक्षाने भुमीपुजनाचा घाट घातला आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण आम्हाला करायचे नाही. भानंग ग्रामस्थ आणि तळा तालुक्यातील जनता सुज्ञ असुन हे काम कोणी मंजूर करुन आणले हे सगळ्यांना ज्ञात आहे.भानंग गावाला आता मुबलक पाणी मिळे पर्यंत आम्ही पाठपुरावा करु. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी राजकारण करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. 

ग्रामीण पाणीपुरवठा जल जीवन मिशन अंतर्गत तळा तालुक्यातील भानंग गावासाठी 53 लक्ष अंदाज पत्रकीय रक्कम पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आली आहे.भानंग ग्रामपंचायत ही शिवसेना पक्षाच्या ताब्यात आहे. रायगड जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून ही योजना मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत लागणारे सर्व ठराव विविध कागदपत्रे शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आली आहेत. ही योजना आराखड्यात मंजूर करण्यासाठी शिवसेना पक्षाने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या योजनेचे भुमीपुजन करण्याचा नैतिक अधिकार शिवसेना पक्षाला आहे. भानंग ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी गेली पंधरा वर्षे झगडत आहेत त्यावेळी आजच्या कामाचे श्रेय घेणारे कुठे गेले होते? असा प्रश्न शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी भानंग गावातील पाणीपुरवठा योजना आम्हीच मंजूर करुन आणल्याचा दावा केला असुन श्रेयवाद रंगला असला तरी एकाच कामाचे दोन वेळा भुमीपुजन करण्याचे भाग्य मात्र भानंग गावला लाभले असुन दोन्ही पक्षांनी भुमीपुजन करुन न थांबता सर्व सामान्य जनतेला पाणी पाजावे अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केेेली जात आहे.

Popular posts from this blog