एन.एम.एम.एस.परीक्षेत वडघर मुद्रे हायस्कूलचे सुयश
माणगांव (प्रतिनिधी) : अर्थिक दुष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी जिज्ञासू , अभ्यासू , चुणूक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्राप्त व्हावी याकरिता इ.८वी तील विद्यार्थ्यांची एन.एम.एम.एस. ही परीक्षा घेतली जाते. गतवर्षी शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये ही परीक्षा कोरोनाचे सावट कमी झाल्यावर घेण्यात आली.
या परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे, ता. माणगांव या शाळेतून ७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी कु. भूमी हरिश्चंद्र धुमाळ हिने ७१.११% गुण मिळवून शाळेत प्रथम, तर कु. नेहा नामदेव मोरे हिने ३४.४४% गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांक प्राप्त करून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. या परीक्षेसाठी सर्व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले.
या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थींनींचे शाळा समितीचे अध्यक्ष महादेव जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली धारसे व सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच शाळेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत कदम यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.