कृषी खात्याकडून पीक स्पर्धेचे आयोजन;
भात नाचणी पीक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा : कृषी कार्यालयाचे आवाहन
तळा (संजय रिकामे) : तळा तालुका डोंगराळ भागात वसलेला असुन या तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने भात व नाचणी ही मुख्य पिके घेतली जातात. तालुक्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी म्हणून कृषी विभागामार्फत विविध प्रयत्न केले जातात.त्याच बरोबर शेतकरीसुद्धा विविध प्रयोग करतात व उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छा शक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखीन उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.तसेच त्यांचे मार्गदर्शन व आदर्श गावातील इतर शेतकरी घेतील त्यामुळे राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून भात व नाचणी पिकासाठी राज्याअंतर्गत पीक स्पर्धा कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
स्पर्धेसाठी तालुका हा आधारभूत घटक असून तालुक्यातील सर्वसाधारण गटातील किमान 10 व आदिवासी गटातील किमान ५ शेतकऱ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे.तसेच सहभागी शेतकऱ्यांनी किमान १० गुंठे क्षेत्रावर सलग पिकाचे क्षेत्र असणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये निश्चित करण्यातआले आहे.पिकाची कापणी गाव पातळीवरील समिती समक्ष होईल. येणाऱ्या उत्पादनाची नोंद ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. विजेतेपदासाठी पात्र होण्यासाठी तालुक्याच्या सरासरी उत्पादकता पेक्षा १.५ पट व त्यापेक्षा अधिक उत्पादकता येणे आवश्यक आहे.विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्राचे वितरण कृषी विभागामार्फत करण्यात येईल.पीक स्पर्धेमध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे. विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांना तालुका पातळीवर अनुक्रमे ५,३,२हजार रुपये तर जिल्हा पातळीवर अनुक्रमे १०, ७,५ हजार रुपये तसेच विभागपातळीवर २५, २०,१५ हजार रुपये व राज्य पातळीवर अनुक्रमे ५०, ४०,३० हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी हा एक चांगला उपक्रम असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नियम व अटी जाणून घेण्यासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सागर वाडकर तालुका कृषी अधिकारी यांनी केली आहे.