समाजकार्य करीत डॉक्टरी सेवा देणारे विळे येथील डॉ. नितिन मोदी यांच्या सेवेला 34 वर्षे पूर्ण

डॉक्टरच्या रूपाने रूग्णांना भेटला देवदूत! 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉ. नितिन मोदी यांनी समाजकार्याबरोबर आपली वैद्यकीय सेवा करीत 34 वर्षे पूर्ण केली आहेत. सेवेच्या 35 व्या वर्षात पदार्पण करतांना त्यांच्या कटुंबियांनी केक कापून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉक्टर समाज सेवक असल्याने सर्व स्तरांतील नागरिकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. मोदी यांनी विळे परिसरात ज्यावेळी पाऊल ठेवले तो काळ अतिशय खडतर होता. केवळ शेती व्यवसाय करून उपजिवीका करणारे शेतकरी विळे सारख्या खेडे गावात रहात होते. आजूबाजूला असणारी गावे म्हणजे भाऊची आळी, सणसवाडी, बेडगाव, भागाड, तासगाव ही सर्व गावे आज जरी आर्थिक दृष्ट्या सक्षम असली तरी ही गावे सुद्धा शेतकऱ्यांचीच! त्यामुळे केवळ गावठी औषधांवर अवलंबून राहणाऱ्या ग्रामस्थांना दवाखान्याची पायरी चढणे कठीण जायचे; शिवाय शेतकऱ्यांची आवक बेताची असल्याने दवाखाना चालवणे अवघड होते. परंतु केवळ वडिलांच्या आग्रहाखातर डॉ. मोदी यांनी विळे परिसरात दवाखाना सुरू केला. 

डॉ. मोदी निजामपूर विभागातील स्वातंत्र्य सैनिक धनजीभाई मोदी यांचे चिरंजीव असून आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करीत आहेत. वडिलांनी देशाची सेवा केली, तर डॉ. मोदी हे गेली  34 वर्षे जनतेची सेवा करीत आहेत. त्या काळात वाहने नव्हती. विळे पंचक्रोशीतील गावे दूर दूर असल्याने वेळप्रसंगी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता चालत जाऊन गावागावात रुग्ण सेवा करीत असत. बहुतेक रुग्णांचे नातेवाईक मुंबई, पुणे, सुरत व अन्य शहरात नोकरी निमित्त गेल्याने अश्या रुग्णांकडे कधी-कधी पैसे नसायचे त्यामुळे अस्या रुग्णांची ते मोफत सेवा करायचे किंवा ते नातेवाईक शहरातून गावी आल्यावर फी द्यायचे. किंवा काहीजण देतही नसत अस्या नातेवाईकांना त्यांनी कधी ही आपल्या आईवडिलांच्या फी बाबत विचारणा केली नाही. 

डॉ. मोदी यांचे शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले असून त्यांनी डॉक्टरी पेशा सांभाळत ते वेगवेगळ्या सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. कार्यतत्परता,सचोटी, सचोटी, सूक्ष्म निरीक्षण वृत्ती, सुनियोजन व उपक्रमशील संघटक म्हणून ते ओळखले जातात. आज त्यांचे वय 57 वर्षे असून ते परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. भैरवनाथ ज्ञानप्रसारक मंडळाचे ते फाऊंडेशन सदस्य आहेत. हि. म. मेता माध्यमिक विद्यालय व स्वातंत्र्य सैनिक कै. धनजीभाई मोदी कॉलेजच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. 

कै. धनजी भाई मोदी मेडिकल फाऊंडेशनची स्थापना करून रक्तदान शिबीर, डोळ्यांचे शिबीर, डेंटल शिबीर अशी अनेक शिबीरे वर्षानुवर्षे ते घेत आहेत. 

कोरोना काळातही ते रुग्णांची सेवा करीत आहेत, वेळप्रसंगी त्यांना योग्य मार्गदर्शन दर्शन करून मदत करीत आहेत. गतवर्षी आरसेनिक अल्बम या गोळ्या त्यांनी वरचीवाडी गामपंचायत व विळे ग्रामपंचायत मध्ये मोफत वाटल्या. कोरोना काळ असूनही कधीही दवाखाना बंद न ठेवता ते अहोरात्र रुग्णांची सेवा करीत आहेत. गंभीर आजार असेल तर एखाद्या रुग्णास तालुक्याला मोठ्या दवाखान्यात जावे लागते त्या वेळी रुग्नाकडे पैशाची व्यवस्था नसेल तर ते स्वतः मदत करतात. कोरोना चा रुग्ण आहे असे आढळल्यास पेशंटला दवाखान्यात पाठविण्याची व्यवस्था करतात. या जमान्यात रुग्णांना मदत करणारे काही डॉ. असतीलही पण डॉ. नितीन मोदी हे विळे परिसरातील ग्रामस्थांसाठी डॉक्टरी सेवेसोबत समाज सेवाही तितक्याच तत्परतेने करताना दिसत आहेत. त्यामुळे डॉक्टरच्या रूपाने देवदूत भेटल्याचा अनुभव येथील रूग्णांना आलेला आहे.

Popular posts from this blog