लोको पायलट व माणगांव पोलीसांमुळे वाचले वयोवृद्ध महिलेचे प्राण
साई/माणगांव (हरेश मोरे) : माणगांव येथे सोमवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11.15 वा. च्या सुमारास एर्नाकुलम-निजामुद्दीन ही ट्रेन मुंबईकडे जात असताना अशोकदादा साबळे कॉलेज जवळ रेल्वे रुळावर आली असता इंजिन चालक यांच्या निदर्शनात आले की, रेल्वे रुळावर एक वयोवृध्द महिला पडलेल्या अवस्थेत दिसून आली. लोको पायलटच्या प्रसंग सावधानतेने त्याने रेल्वे थांबवली. त्यामुळे वृद्ध महिलेचे प्राण वाचले.
ही माहिती समजताच माणगांव वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस लालासाहेब वाघमोडे तसेच माणगाव पोलीस स्टेशन महिला पोलीस हवालदार सानप व पोलीस अंमलदार साटम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घेऊन सदर महिलेला बाजूला घेऊन विचारपूस केली असता महिलेची मानसिक स्थिती बिघडली असल्याची माहिती समोर आली.
सदर वयोवृद्ध महिला ही माणगांव तालुक्यातील मौजे भादाव येथील राहणारी असून कुसुम राणे असे त्यांचे नाव आहे. सदर महिलेच्या नातेवाईकांना बोलावून महिलेला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.