पाटणूस-भिरा रस्ता पूर्ण तुटला, रस्त्यावरून वाहतायत पाण्याचे झरे!
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस भिरा रस्ता पूर्ण तुटला असून रस्त्यावरून आता पाण्याचे झरे वहात आहेत. 21, 22 जुलै ला झालेली तुफान पर्जन्यवृष्टी, देवकुंड पर्यटनासाठी होत असलेली वाहनांची गर्दी तसेच जिल्हा परिषदेकडून गेली 15 वर्षे पाटणूस-भिरा रस्त्याकडे झालेले दुर्लक्ष व टाटा पॉवर भिरा यांचे "कळतंय पण वळत नाही" या भूमिकेमुळे पाटणूस-भिरा या रस्त्याची अशी अवस्था झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी देवकुंड पर्यटसनासाठी आराखडा तयार करण्यास मंजुरी दिली असून पावसाळा संपल्यानंतरच या कामाला गती येईल असे एकंदरीत पावसाळी हवामानावरून स्थानिकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे रस्ता कितीही खराब झाला तरी पावसाळा संपल्याशिवाय तरी रस्त्याचे काम होणार नाही हे आता जवळपास ग्रामस्थांना कळून चुकले आहे. त्यामुळे रस्ता कितीही तुटला तरी ग्रामस्थांना या रस्त्यावरुन ये जा करावीच लागणार आहे. तूर्त पावसाळा सुरू आहे तोपर्यंत निदान रस्त्यावरील खड्डे तरी जिल्हा परिषद कडून भरण्यात यावेत अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.