एक्सेल कंपनीचे प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत "साटेलोटे?" कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार उघडकीस!
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवरच कारवाई होणे आवश्यक!
रोहा (प्रतिनिधी) : धाटाव औद्योगिक परिसरातील "एक्सेल" कंपनीतून बाहेर पडणारे प्रदूषण आणि दुषित पाणी हा सध्या चर्चेचा विषय बनून राहिला असून त्यातच आणखी एक धक्कादायक प्रकरार उघडकीस आलेला आहे. या कंपनीचे अधिकारीच बढाया मारत असतात की, "प्रदूषण नियंत्रण मंडळ आमचे काहीही वाकडे करू शकत नाही, कारण त्यांच्यासोबत आमची सेटींग आहे!"
या धक्कादायक प्रकारामुळेच कंपनीच्या प्रदूषणावर कारवाई का होत नाही ते स्पष्ट झालेले आहे. प्रदूषणाचा किल्ला लढविणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे हे कृत्य म्हणजे "कुंपणानेच शेत खाण्याचा" प्रकार असल्याचे दिसून आलेले आहे. ही कंपनी भयानक प्रदूषण सोडत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून प्रदूषण नियंत्रण मंडळ आस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कंपनीतून येथील 'गंगा' नावाच्या नदीत केमिकयुक्त प्रदूषित पाणी सेडले जात आहे. तसेच कंपनीच्या परिसरातील रोठ खुर्द, रोठ बुद्रूक, निवी, वाशी, लाढर, तळाघर, बोरघर या गावांतील नागरिकांच्या शेतीवर देखील या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होऊन येथील भातशेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली आहे. त्यामुळे या कंपनीच्या प्रदूषणाला पाठीशी घालणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवरच कारवाई होणे आवश्यक आहे.