रोहा वीज वितरण कार्यालयाच्या कारभारावर आमदार अनिकेत तटकरे नाराज!
'गणेशोत्सवापर्यंत जनतेच्या समस्या सोडविल्या नाहीत तर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल' असा दिला इशारा
रोहा (रविना मालुसरे) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय रोह्याच्या कारभारावर आमदार अनिकेत तटकरे यांनी कडक शब्दात ताशेरे मारले. गणेशोत्सवापर्यंत जनतेच्या समस्या सोडविल्या नाहीत तर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.
दिनांक ३० ऑगस्ट २०२१ रोजी रोहा नगर परिषद कार्यालयात जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी वीज कर्मचाऱ्यांची अरेरावी, प्रलंबित प्रश्न व अनियंत्रित कारभाराचा पाढाच आमदारांसमोर वाचला.वीज कर्मचारी हे जनतेच्या समस्यांप्रती गंभीर नसल्याचे विज ग्राहक सांगत आहेत. विशेषतः होंडिलकर व वाघमारे ह्या कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याचे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणुन दिले. या अगोदरच्या दोन आढावा सभांमधील प्रश्नांची पुर्तता झालेली आढळून आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार अनिकेत तटकरे यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.आगामी काळात सणासुदीचे दिवस येत आहेत.आपण आपला कारभार सुधारा, जनतेचे प्रश्न सुटले नाहीत तर लोकप्रतिनिधी म्हणून मला योग्य ती कारवाई करावी लागेल. अन्यथा हे कार्यकर्ते आक्रमक झाले तर आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करतील. ती वेळ येऊ देऊ नका असा इशाराही आमदार अनिकेत तटकरे यांनी दिला. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयवंत मुंडे यांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया दिली असून आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात वीज वितरण कार्यालय रोह्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांचे समवेत रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयवंत मुंडे, अमित मोहिते, मयुर खैरे, रविंद्र चाळके, किरण मोरे, तानाजी देशमुख, गौरव सुर्वे अमोल टेमकर, मंगेश देवकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार अनिकेत तटकरे यांच्या इशाऱ्यानंतर उन्मत्त वीज कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा होते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.