सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित
रायगड (प्रतिनिधी) : ९ ऑगस्ट रोजी वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगांव येथे दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटना व एकलव्य आदिवासी संघटना रायगड जिल्हा यांच्या वतीने आदिवासी लोकांच्या उत्कर्षासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आधिकारी वर्गाचा सन्मान व्हावा म्हणून जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण संभाजी नावले यांना या दोन्ही संघटनांच्यावतीने आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खाकी वर्दितील पोलीस कायदा, सुव्यवस्था, शांतता आणि इतर नियमांचे पालन व्हावे यासाठी कटिबद्ध असतात. त्यांचे हे कर्तव्य पार पाडत असताना आपल्या खाकी वर्दितही एक माणूस जीवंत असतो. या माणूसकीचे दर्शन श्रीकृष्ण नावले यांनी अनेक वेळा करून दाखवले आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबरोबर कोरोना काळात आदिवासी, वंचित, गरीब, टगरजू समाजाला मदत करणे, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे टिकवून ठेवण्यासाठी मदत करणे, उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, रंजल्या गांजल्यांची खाकी वर्दीतही त्यांच्यातील माणूसपण ओळखून सेवा करणे अशा सर्व बाबींचा विचार करून सदरचा हा आदिवासी मित्र पुरस्कार रा.जि.प.सदस्य दयाराम पवार, वासंती वाघमारे, संघटनेचे अध्यक्ष भिवा पवार, उमेश जाधव, राजन पाटील, नथुराम वाघमारे, दत्ता पवार, संतोष वाघमारे, नामदेव हिलम, बबन कोळी, देऊ हिलम, राम कोळी, सुदाम जाधव, संजय कोळी, संजय काटकर, केशव वाघमारे, बाळकृष्ण काप या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अतिशय शिस्तप्रिय, वक्तशीर, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आधिकारी म्हणून श्रीकृष्ण नावले यांची गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये ओळख आहे. याआधी त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखा रायगड मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे, मात्र हे काम करत असताना माणसातील खरा माणूस शोधण्याची किमया वेगळीच आहे आणि हिच त्यांची खासियत आहे. अशा या खाकी वर्दीतील कर्तव्यनिष्ठ माणसाला सलाम!