ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांची ओबीसी महासंघाच्या कोकण कार्याध्यक्ष पदी नियुक्ती
तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कोकण विभाग कार्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. पी. बी. कुंभार यांनी त्यांच्यावर कोकण विभाग कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
पुरुषोत्तम मुळे हे गेली 25/30 वर्षे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत. संस्थापक अध्यक्ष नामदेव शिंपी समाज महासंघ, चेअरमन कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा, संचालक जी. एम. वेदक काॅलेज ऑफ सायन्स तळा, जेष्ठ सल्लागार तळे तालुका मराठी पत्रकार संघ, संचालक एस. एस. निकम इंग्लिश स्कूल तळा अशा विविध संस्थाची पदे प्राप्त केलेल्या शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या श्री. मुळे यांना ओबीसी महासंघाच्या कोकण कार्याध्यक्ष पदाची नवी जवाबदारी देण्यात आली आहे.
भारत देशामध्ये इतर मागासवर्ग जातींची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्र राज्यातही एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्म्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. ओबीसी महासंघ ही संघटना ओबीसींच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना असून ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी संघटना आहे. या संघटनेची कोकणाची धुरा अनुभवी ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दिलेली जबाबदारीला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पुरुषोत्तम मुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. ओबीसी महासंघाच्या कोकण कार्याध्यक्ष पदी पुरुषोत्तम मुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.