धाटाव परिसरात प्रदूषणाचे तांडव, नागरिकांच्या आरोग्याला धोका! 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष 

रोहा (समीर बामुगडे) : धाटाव औद्योगिक वसाहतीत कंपन्याकडून होणाऱ्या वाढत्या प्रदुषणामुळे  नागरिकाचे आरोग्य व पर्यायाने जीवन धोक्यात आले आहे. शासन व प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हे प्रदूषण म्हणजे कायमचीच डोकेदुखी बनून राहिली आहे. वायू प्रदुषण तर आहेच, परंतु या कपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्याने जल आणि जमिन यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

येथील प्रदुषणामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दमा, खोकला यांसारखे आजार वाढून येथील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना शुद्ध हवे ऐवजी वायुमिश्रीत दुषित हवेची भेट येथील कंपन्यांकडून मिळत आहे. जसे चोर अंधाराचा फायदा घेऊन चोरी करतात त्याचप्रमाणे कंपन्यांनी धुक्याचा फायदा घेऊन वायुप्रदूषणात वाढ केली आहे. 

याचा त्रास लहान बालके व वृध्द मंडळी यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रदुषणामुळे नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरणे मुश्कील झाले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करुन प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीही कारवाई करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अर्थात, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे येथील कंपन्यांच्या "ताटाखालचे मांजर" बनलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. वरिष्ठांनी तातडीने या प्रकरणीची गंभीर दखल घ्यावी अन्याथा जर का येथे मोठा अनर्थ घडला तर त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळच जबाबदार असेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Popular posts from this blog