स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त फौजी सौरभ खांडेकर यांचा यथोचित सन्मान 

शिववंदन वाचनालय वाशी यांचा स्तुत्य उपक्रम

रोहा (रविना मालुसरे) : रोहा तालुक्यातील शिववंदन वाचनालय वाशी यांच्यावतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी वरवठणे - मेढा येथील सेवानिवृत्त सैनिक जवान सौरभ खांडेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. भारतमातेच्या रक्षणार्थ प्राण पणाला लावून आपली सेवा बजावणाऱ्या सैनिकांप्रती  कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्र, प्रेरणादायी शिवविचार प्रसार आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने   शिववंदना वाचनालय वाशी हे अनेक उपक्रम राबवित असते. 

गावांतील मंदिर व परिसर स्वच्छता, गाव स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, कचरा संकलन, सार्वजनिक कचरा कुंड्या उपब्लधता, कलामंच रंगमंच  बांधणे, उन्हाळ्यात मुक्या  प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी उपलब्धता, इ. समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.

ज्या तरुणांनी समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत कार्य केले आहे अशा व्यक्तीमत्वांस सन्मानित करण्याचे काम शिववंदना वाचनालयाचे संस्थापक प्रशांत बर्डे यांच्या संकल्पनेतून पार पाडले जात  आहे.

भारत भूमीच्या रक्षणार्थ उत्तम सेवा करीत ज्यांनी तब्बल सतरा वर्षे देशाच्या विविध प्रांतात प्रामाणिकपणे सेवाकाळ पूर्ण केलेल्या वरवठणे - मेढा येथील सेवानिवृत्त फौजी सौरभ खांडेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सर्वसाधारण कुणबी शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन २४ जुलै २००४ रोजी सैन्यात ते भरती झाले. प्रथम प्रशिक्षण मराठा सेंटर बेळगाव येथे झाले. त्यानंतर राजस्थान, श्रीगंगा नगर, मणिपूर, पुंच, जम्मू काश्मीर, श्रीनगर जम्मू काश्मीर ग्वाल्हेर मध्ये प्रदेश, कारगिल जम्मू- काश्मीर, बिकानेर राज्यस्थान, राजौरी जम्मू काश्मीर आदी देशाच्या कानाकोपऱ्यात भारत भूमीच्या रक्षणार्थ तब्बल सतरा वर्षे अहोरात्र मेहनतीने  आपली देशसेवा बजावली. या भारत मातेच्या पुत्राचा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी क्षणाचे औचित्य साधत यथोचित सन्मान  करण्यात आला.

यावेळी शिववंदन वाचनालय वाशी मंडळाचे संस्थापक प्रशांत बर्डे, बालशिव चरित्र व्याख्याता आर्यन बेर्डे, शिव भक्त, शिव विचार प्रेमी बहु संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विरेंद्र जंगम, प्रशांत बेर्डे, विकास जोगडे, सहादेव बेर्डे इ. बालशिव भक्त, शिवप्रेमींनी अथक परिश्रम घेतले.

Popular posts from this blog