माणगांवात "जागतिक आदिवासी दिन" उत्साहाने साजरा
आदिवासी कला, परंपरा, संस्कृती यांचे प्रदर्शन
रायगड (प्रतिनिधी) : रानावनात, डोंगरदऱ्यात काबाडकष्ट करून सन्मानाने राहणाऱ्या आदिवासी समाजाचा आत्मसन्मानाचा दिवस म्हणजे "जागतिक आदिवासी दिन" होय. ९ ऑगस्ट रोजी हा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो. याच धर्तीवर दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटना व रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माणगांवच्या आश्रम शाळेत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
यामध्ये आदिवासी बांधवांच्या पारंपरिक नत्य, कला संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. रायगड भूषण शाहीर चंद्रकांत बुवा कदम यांनी कुमशेत आदिवासी वाडीवरील तरूण मुलांच्या माध्यमातून जाखडी (बाल्या डान्स) हे नृत्य सोमजाई कला पथकाने सादर केले. त्याचबरोबर पारंपरिक नृत्य व संगीत वाद्य तालावर येरद, कुंभार्ते, सुर्ले, तारणे आणि शिरवली आदिवासी वाडीवरील महिलांनी आपल्या पारंपरिक खालू बाज्यावरील विविध आदिवासी नृत्य सादर केले. यामध्ये विशेष म्हणजे खालू बाज्या या पारंपरिक वादयानी मोठी रंगत आणली.
आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी झटणारे पोलीस खात्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण संभाजी नावले, कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, माणगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे महादेव सखाराम जाधव, विधी विभाग ॲड. योगेश तेंडुलकर, सामाजिक क्षेत्रातील संजय घाग, युवकांचे नेतृत्व रोहन शिर्के, पत्रकार संतोष सुतार, विश्वास निकम, शाहीर चंद्रकांत बुवा कदम, पापाशेठ फोपलूनकर आणि सर्व विकास दीप संस्थेचे अध्यक्ष फादर रिचर्ड क्वाद्रोस यांना समाजाकडून शाल, श्रीफळ, पुरस्काराचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटनेचे अध्यक्ष उमेश जाधव, एकलव्य आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष भिवा पवार, रा.जि.प. सदस्य दयाराम पवार, वासंती वाघमारे ॲड. अनिकेत ठाकूर, राम मारोती पवार, बबन पवार, संतोष वाघमारे, नथुराम वाघमारे, सुदाम जाधव, देऊ हिलम, संजय कोळी, राम कोळी, जगन मुकणे, संजय काटकर, बबन कोळी, केशव वाघमारे, सुशिल कासारे, धर्मराज कोळी, महादेव कोळी गणपत पवार, शांताराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित समाजाला मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपले हक्क, अधिकार याबरोबरच कर्तव्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवावी. आपल्या समाजाचा विकास व्हायचा असल्यास आपल्या मुलांना आपण शिकवले पाहिजे. शिक्षणाने माणूस मोठा होतो. म्हणून शिका, संघटित व्हा. शिक्षण घेण्यासाठी अडसर निर्माण झाल्यास आमचे सहकार्य घ्या.आम्ही सहकार्य करू. पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी आपण डॉ. राजेंद्र भरूड यांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन शिक्षण घ्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही ते आय. ए.एस झाले. स्वतःवर विश्वास ठेवा. व्यसनांपासून दूर रहा, अंधश्रद्धेला थारा देऊ नका, आपापसातील मतभेद सामोपचाराने सोडवा. वेळ व पैसा वाया घालवू नका, शासकीय योजनांचा अभ्यासूपणे लाभ घ्या असे शेवटी सांगितले.
याखेरीज सर्वच पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण शिक्षण घेणाऱ्या अल्पेश पवार यांनी समाजाचे उदबोधन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समाजाची बुलंद तोफ, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे, लढवय्ये दिनेश कातकरी यांनी आदिवासी समाजाच्या दिशा व दशा या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्वच आदिवासी वाड्यातून समाजबांधवांनी प्रातिनिधिक स्वरुपात हजेरी लावून कार्यक्रमला सोभा वाढविले.
दरम्यानाचा काळात या कार्यक्रमासाठी 'भारत विकास संगम' या संघटनेचे पदाधिकारी समाजसेविका मंजुषा गोटरकर आणि विद्या बोरंबे आवर्जून हजेरी लावले. ही संस्था रायगड जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी नव्याने आपला कार्यक्षेत्र म्हणून काम सुरु केले आहे. तसेच त्यांचाही यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असता मंजुषाताई यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना आवाहन केले की तुमचा उन्नतीसाठी आम्हाला काम करण्यासाठी संधी द्यावी म्हणून सांगितले.