भारत देशामधील 75 व्या सिएनजी सेंटरचा मान प्रथम रायगडला
कशेणे येथे सिएनजी लक्ष्मण फ्युएल सेंटरचे उद्घाटन
साई/माणगांव (हरेश मोरे) : माणगांव तालुक्यातील कशेणे या ठिकाणी मुंबई-गोवा हायवे लगत शुक्रवार दि. 27 ऑगस्ट रोजी सिएनजी लक्ष्मण फ्युएल सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. भारत पेट्रोलियम अंतर्गत सदरचे सेंटर उभारण्यात आले आहे. भारताचा 75 वा अमृत महोत्सव या निमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये 75 सिएनजी सेंटर उभारण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रायगड जिल्हामध्ये माणगांव तालुक्यात कशेणे गाव मुंबई-गोवा हायवे लगत एक सिएनजी सेंटर उभारण्यात आले आहे.
या सेंटरचे पनवेल येथील मालक तसेच नामवंत उद्योजक लक्ष्मण पाटील यांनी कशेणे येथील हायवे लगत हे सेंटर उभारले असून या सेंटरच्या उदघाटन प्रसंगी रमण मलिक, अचमन ट्रेंटन, अनुप तनेजा, रमेश मिना, उमेश कुलकर्णी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यांच्या हस्ते या सिएनजी सेंटरचे उदघाटन मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी मालक लक्ष्मण पाटील, प्रविण पाटील, अस्मित पाटील, तळाशेत इंदापुरचे माजी उपसरपंच अजित भोनकर, सदस्य संतोष मुढे, युवा उद्योजक उदय डाळ, रंजित मालोरे तसेच अनेक डीलर तसेच ग्राहक बहुसंख्येने उपस्थित होते. पेट्रोल पंप आणि सिएनजी हे एकत्रच असून व अनेक सुविधा उपलब्ध असल्याने या सेंटरचा उपयोग अनेक वाहन धारक यांना होणार असून पनवेल ते खेडपर्यंत गॅस सेंटर नव्हते. त्यामुळे अनेक वाहन धारकांना या सेंटरचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.
मुंबई - गोवा हायवेवर पनवेल ते खेड पर्यत एकही सिएनजी गॅस सेंटर नव्हते. सिएनजी वाहन चालक यांना रोहा आणि पनवेल नेरुळ या ठिकाणी गॅस भरण्यास जावे लागत होते. परंतु आता माणगांव तालुक्यात इंदापूर कशेणे गाव हायवे लगत सिएनजी सेंटर उपलब्ध झाल्यामुळे अगदि पोलादपुर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, तालुक्यातील तसेच लोणेरे, गोरेगाव, इंदापुर, निजामपुर या विभागातील ग्राहक यांच्यामध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे.
या कार्यक्रम प्रसंगी माणगांव तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातुन अनेक मान्यवर उपस्थित होते.