डोणवत येथील स्मशानभूमीची दुरवस्था! दुरूस्तीसाठी तांबाटी ग्रा.पं. कडे निधी नाही?
डोणवत (सुधीर देशमुख) : खालापूर तालुक्यात भरमसाठ उत्पन्न असलेल्या तांबाटी ग्रुप-ग्रामपंचायत हद्दीतील डोणवत येथील स्मशानभूमीची प्रचंड दुरवस्था झालेली असून येथे दुरूस्तीचा खर्च करण्याची ग्रामपंचायतीची ऐपत नाही का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
गेल्यावर्षी वादळ व पावसामुळे येथील स्मशानभूमीची शेड व पत्रे कोसळून प्रचंड दुरवस्था झाली, पण तेव्हापासून आजपर्यंत येथे दुरूस्तीचे काम करण्यात आलेले नाही. सध्या करोडो रूपयांच्या निधीतून तांबाटी ग्रा. पं. च्या नवीन इमारतीचे बांधकाम जोरात सुरू आहे. सदर बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध होतो; मग स्मशानभूमीच्या दुरूस्तीसाठी ग्रा. पं कडे निधी येत नाही का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. डोणवत, गोरठण, वनवढे या गावांमध्ये तर विकासकामे झालेलीच नाहीत! उलट ज्या ग्रा. पं. मध्ये उत्पन्न कमी आहे त्यांनी या कोरोना कालावधीत ग्रामस्थांसाठी कोव्हीड सेंटर उभारून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण केले. परंतु तांबाटी ग्रामपंचायत डोणवत ग्रामस्थांसाठी मागील वर्षभरात साधी स्मशानभूमीची शेड बांधू शकली नाही! ही येथील ग्रामस्थांची शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल.