साई येथील शेतकरी प्रवीण अधिकारी यांनी घेतले गांडूळ बीज उत्पादन
साई (हरेश मोरे) : माणगांव तालुक्यातील साई परिसरातील शेतकरी प्रवीण अधिकारी हे मागील दोन वर्षांपासून गांडूळ बीज उत्पादन घेत असून सुरुवातीला त्यांनी गांडूळ खत तयार करून स्वतःच्या शेतीसाठी वापर केला. त्यामुळे त्यांनी भातशेतीमध्ये चांगले उत्पादन घेतले.
त्यांनी सांगितले या गांडूळ बिजपासून शेतकरी गांडूळ खत तयार करू शकतो. शेती केमिकल विरहित व पौष्टिक अन्न तयार करू शकतो. भुमातेला विनाशकारी केमिकल विरहित खतापासून शेतकरी वाचवू शकतो.
गांडूळ खतामुळे जमिनीचा सामु उदासीन करण्यास मदत होते, गांडूळ खत वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो, जमीन भुसभूशीत होऊन पोत सुधारतो, उत्पादन क्षमता व जमिनीची सचिद्रता वाढते, जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते, जमिनी मध्ये प्राणवायुचे प्रमाण वाढते त्यामुळे जैविक क्रिया वाढते, गांडूळ खतमुळे उपायुक्त जिवाणूची संख्या 3ते 5पटीने वाढते, पिकांच्या उत्पादनत वाढ होते, त्याच बरोबर उत्पादनतील प्रत सुधारते, विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो. तसेच रासायनिक खत वापरात खतावरील काही खर्च कमी होतो व पिकांचे उत्पादन वाढते. त्यामुळे गांडूळ खतामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते.