बोरिवली (ठाणे कोलाड कुडली मार्गे) भिरा एसटी बसच्या मार्गात बदल

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : रोहा आगार अंतर्गत बोरिवली (ठाणे कोलाड कुडली मार्गे) भिरा एसटी बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. नुकतीच सुरू करण्यात आलेली वरील बस मुंबईत राहणाऱ्या प्रवाशांच्या उपयोगाची नव्हती. या बसचे जे मार्ग आहेत तेथील बहुतांश प्रवाशी मुबंईचे रहिवासी आहेत आणि म्हणून सणसवाडी-कोंडेथर ग्रामस्थ कोर कमिटी पंचायत मुंबई यांनी परिवहन, संसदीय कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय-मुंबई यांना पत्र व्यवहार करून रोहा अंतर्गत भिरा-बोरिवली या बस सेवेच्या मार्गात आणि वेळेत फेर बदल करण्याबाबत निवेदन दिले. या निवेदनाची तातडीने दखल घेत परिवहन विभागाने आगार प्रमुखांशी संपर्क करून नागरिकांनी सुचविलेल्या मार्गानेच बस सेवा सुरू करावी असे सूचित केले व त्याप्रमाणे दि. 5 जुलै 2021 पासून कायम स्वरूपात जनतेच्या प्रवासासाठी चालू करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कळविलेल्या पत्रानुसार सदर बस 6 जुलै 2021 पासून दररोज सकाळी 6 वा. बोरिवली आगार मधून सुटेल व ती नानसी कॉलनी, सुकर वाडी, एस.व्ही. रोड मार्गे शंकर मंदिर कांदिवली, मालाड (प.), गोरेगाव (प.), अंधेरी (प.) पोस्ट ऑफिस, नानावटी हॉस्पिटल, आशा टॉकीज सांताक्रुज, खार पोलीस स्टेशन चौकी, बांद्रा पंप, कलानगर, धारावी सायन मार्गे नेहरू नगर डेपो कुर्ला, पनवेल, पेण, नागोठणे, कोलाड, सुतारवाडी, नारायणगाव, कुडली विळे, पाटणूस भिरा असा मार्गक्रमण करीत सदर बस सुरू राहणार आहे. तसेच भिरा येथून परत 3:30 (साडे तीन) वा. बोरिवलीकडे रवाना होईल. सर्व प्रवाशांनी मोठ्या संख्येने या बसचा लाभ घ्यावा असे आवाहन सणसवाडी-कोंडेथर ग्रामस्थ कोर कमिटी पंचायत-मुंबई यांनी प्रवाशांना केले आहे. सदर बस सुरू करण्यासाठी प्रयत्न व सहकार्य केलेले परिवहन मंत्री अनिल परब, आमदार प्रकाश सुर्वे, सणसवाडी कोर कमिटी व पदाधिकारी, प्रमुख मार्गदर्शक दिपक सणस, गणपत जाधव, गुलाब नलावडे, पाटणूस सरपंच सौ. नीलिमा निगडे, सरपंच निलेश वांजळे, सरपंच उत्तम कामतेकर, रोहा आगारमधील अधिकारी गाडेकर आणि समीर सरफळे तसेच इतर कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सणसवाडी ग्रामस्थ, बसच्या मार्गात येणारी सर्व गावे व ग्रामस्थ यांनी सर्व मान्यवारांच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत.

Popular posts from this blog