पाटणूस रा.जि.प.शाळेत पालकांसाठी ऑनलाईन अभ्यासाचे प्रशिक्षण 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : गेल्या दिड वर्षापासून कोरोना साथीमुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. यापुढेही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राज्यातील शाळा नक्की कधी चालू होतील हे मात्र कुणीच सांगू शकत नाहीत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गेल्या वर्षभरापासून पाटणूस शाळेतील प्रविण राठोड व दिगंबर खटके हे दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. गेले वर्षभर विद्यार्थ्यांच्या गृहभेटी व ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये  खंड पडू दिला नाही. चालू वर्षीही शाळा कधी चालू होतील याचा काहीच अंदाज नसल्याने व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अध्ययन-अध्यापनात पालकांचा सहभाग व तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यासाठी पाटणूस जि.प. शाळेत कोविडविषयक सर्व नियमांचे पालन करून पालकांना पाल्याचा अभ्यास घेत असताना स्वतःजवळ असणाऱ्या अँड्रॉईड मोबाईल फोनचा वापर कसा करायचा याविषयी शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री. खटके यांनी प्रशिक्षण दिले. यामध्ये व्हॉट्सअपवर आलेल्या पीडीएफ फाईल्स कशा ओपन करायच्या, पीडीएफमध्ये दिलेल्या लिंकवरून युट्यूबवरील व्हिडीओ कसे पाहायचे, गुगल फाॅर्मद्वारे दिलेली चाचणी कशी सोडवून घ्यायची, पाठ्यपुस्तकातील क्युआर कोड व दिक्षा ॲपचा वापर कसा करावा, माझा अभ्यास ॲपचा वापर, Google Meet द्वारे ऑनलाईन क्लास कसा जोडावा इत्यादी गोष्टींविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. श्री. राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देत असताना कोणती काळजी घ्यावी, विद्यार्थी मोबाईल वापरत असताना पालकांची भुमिका काय असावी याविषयी मार्गदर्शन केले. शालेय पातळीवरील कोणतेही शैक्षणिक उपक्रम राबवत असताना रवाळजे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. राऊत नेहमीच प्रेरणा व मार्गदर्शन देत असतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेतील दोन्ही शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश चाळके व उपस्थित पालकांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

Popular posts from this blog