गोवे ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद!
- पालकमंत्री आदिती तटकरे
रोहा (रविना मालुसरे) : ग्रुप ग्रामपंचायत गोवेच्या वतीने अल्पावधीत विक्रमी विकास कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत त्याबद्दल रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
दिनांक नऊ जुलै रोजी गोवे, ता. रोहा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणाचा पायंडा पाडल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "वरदा सुनिल कन्यादान" योजनेची माहिती विषद करताना त्यांनी साहेब, भाई आणि ताई राजकारणात असून त्यांच्या पेक्षाही अधिक लोकांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध हे "आईचे" असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे "वरदा सुनिल कन्यादान योजना" ग्रामपंचायत राबवित असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी केवळ पाच महिन्याच्या कालावधीत पाच कोटींची विकास कामे पूर्ण केल्याबद्दल कौतुकाची थाप दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनात महिलांनी पुढाकार घेऊन काम केल्याबद्दल या ग्रामपंचायतीत महिलांचे स्थान अधोरेखित होत असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.
सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. "वरदा सुनिल कन्यादान" योजनेअंतर्गत सासरी जाणाऱ्या प्रत्येक कन्येस रुपये पाच हजाराचा धनादेश ग्रामपंचायतीमार्फत दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी घरघंटी, पापड मशीन, महिला भजनी मंडळासाठी साहित्य उपलब्ध करण्यात येत आहे. वीस लिटर शुद्ध आरो वॉटर जार फक्त पाच रुपये प्रति जार दराने नागरिकांना दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार सुनील तटकरे साहेब, आदितीताई तटकरे व अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्यामुळेच आपण ही किमया करू शकलो असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.
गोवे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी महिला नेतृत्व व ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया जाधव यांनी केले. त्यांनी आपल्याला लाघवी शब्दांमध्ये आदितीताई तटकरे व अनिकेत भाई तटकरे यांच्या कार्याची महती सांगितली. ग्रामपंचायतीसाठी त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले.
खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोवे ग्रामपंचायतीने राबवलेल्या पेयजल प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत भाई तटकरे, पंचायत समिती सदस्या सिद्धी राजिवले, रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, तानाजी जाधव, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष्या प्रितम ताई पाटील, युवक अध्यक्ष जयवंत दादा मुंडे, युवती संघटक रविना मालुसरे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पक्ष कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला.