पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीबाहेर स्थानिकांवर होणाऱ्या गुंडगिरी विरोधात स्थानिकांचे माणगांव पोलीस ठाण्याबाहेर आमरण उपोषण
'मेरे बाप का सपना रायगड का सब माल अपना!'
माणगांव (प्रमोद जाधव) : माणगाव तालुक्यातील विळे भागाड एम आय डी सी परिसरात असणाऱ्या पोस्को महाराष्ट्र स्टील या कंपनीच्या भंगार उचलण्याच्या वादावरून गेले दीड ते दोन महिने वाद सुरू आहेत. अशामध्ये भंगार वाहतूक होऊ न देणे, भंगार वाहतुकीच्या गाड्या फोडणे, पंक्चर करून नुकसान करणे अशा प्रकारच्या घटना रात्री अपरात्री देखील घडत असल्याने या सर्व गोष्टी घडविणाऱ्या विषयी सक्त कारवाई करण्यात यावी. यांसारख्या असंख्य मागण्या समोर ठेवून ग्रामपंचायत भागाड सरपंच प्रकाश जंगम, विळे वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे, शिवसेना अवजड वाहतुक सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उतेकर, एस पी लॉजीस्टिकचे मालक संतोष पोळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भूमिपुत्र १२ जुलै पासून माणगांव पोलीस ठाण्याच्या बाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत स्थानिकांवर अन्याय करणाऱ्यांवर प्रशासन कडक कारवाई करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे स्थानिक उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
या उपोषणाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रविभाऊ मुंढे यांनी भेट देऊन पाठींबा दिला. यावेळी त्यांच्या समवेत माणगांव भाजप तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुंढे यांनी भारतीय जनता पार्टी स्थनिक भूमिपुत्रांच्या पाठीशी आहे. या उपोषणाला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर लवकरच भेट देणार असल्याचे सूचक वक्तव्य देखील केले आहे. 'मेरे बाप का सपना रायगड का सब माल अपना' असा टोलाही त्यांनी या वादात भाग घेतलेल्या नेत्यांना लगावला.
या संदर्भात माणगाव पोलीस निरीक्षक यांची भेट घेतल्यानंतर सदर प्रकारात तक्रारकर्त्यांकडून आवश्यक माहिती मिळाली नसल्याने संबंधितावर कारवाई करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मात्र आता तक्रारदारानकडून रीतसर बाबी पूर्ण केल्या जात आहेत व आम्ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रयत्नशील आहोत असे देखील माणगाव पोलीस निरीक्षक यांच्या कडून सांगण्यात आले आहे.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
१) गाड्यांची तोड-फोड करून जी दहशत निर्माण केली जात आहे त्यांच्यावर कडक कलमे लावून दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
२) स्थानिक एस पी लॉजीस्टिक कंपनी चा व स्थनिकांचा रोजगार राजकिय दबावापोटी बंद करण्यात आला चालू करण्यात यावा.
३) पोस्को कंपनी बाहेर जो बेकायदेशीर जमाव जमा होतो त्याकरिता विशेष पोलीस पथकाची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी.
४) बाहेरील गुंड प्रवृत्ती चे लोक येऊन स्थानिक लोकांना दमदाटी करून दहशत निर्माण केली जात आहे त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
पोस्को स्टील महाराष्ट्र कंपनीच्या भंगार वाहतुकदार यांच्या बाबतीत नेहमीच होणाऱ्या वाद व वाहनांचे नुकसान याबाबत तक्रारदारांकडून तक्रारीची अपेक्षित असलेली प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने संबंधितांवर कारवाई होण्यास विलंब होत आहे.आता तक्रारदारांकडून जबाबाची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने लवकरच कायदेशीर कारवाई ची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल होईल.आम्ही कुठेही कायदा व सुव्यवस्थेला बाधा होऊ नये याकरिता आम्ही दक्षता घेत आहोत.
- श्री. अश्वनाथ खेडकर, पोलीस निरीक्षक माणगांव पोलीस ठाणे
जोपर्यंत पोस्को कंपनीच्या बाहेर बेकायदशीर जमाव जमा करून स्थानिकांच्या भंगार वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुंडगिरी करणाऱ्या लोकांवर प्रशासन कारवाई करत नाही तोपर्यंत जीव गेला तरी आम्ही उपोषण मागे घेणार नाही
- उपोषणकर्ते श्री. संतोष पोळेकर, ज्ञानेश्वर उतेकर