संत गाडगेबाबा सेवा मंडळ निवीच्या तरुणांनी महाडच्या पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात !
रोहा (समीर बामुगडे) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुसळधार पावसामुळे महापुराची परीस्थिती निर्मण झाली होती. या महापुरामुळे महाड शहर व ग्रामीण भाग पुर्णपणे पाण्याखाली गेला. पावसाने विश्रांती घेतल्याने आता पुराचे पाणी ओसरण्यात सुरुवात झाली आहे. तेथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सध्या निवी गावच्या तरुणांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील नागरिकांची भेट घेतली तेव्हा त्यांना आपल्या मदतीची गरज आहे हे जाणवले. संत गाडगेबाबा मंडळ निवी तर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. तसेच युवक अमित मोहिते, राकेश बामुगडे, संतोष भोकटे, नंदकुमार बामुगडे, सदानंद ठाकूर, नंदू भगत, राजेंद्र तुपकर, संतोष बामुगडे या मंडळींनी महाड तालुक्यात जाऊन साफसफाई व स्वच्छता करण्यासाठी सोबत घमेली, फावडे व इतर अवजारे घेऊन तेथे गाव, मंदिर, घरे व परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमेला हातभार लावला. संकटाच्या वेळी मदतीला धावून गेलेल्या रोहा तालुक्यातील निवी गावातील सर्व युवकांचे अभिनंदन व कौतुक शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी केले.