माणगांव बस-स्थानकातील पार्सल कक्षातील स्लॅब कोसळला
जीवीतहानी टळली मात्र वित्तीय नुकसान
माणगांव (प्रमोद जाधव) : माणगांव शहरातील बसस्थानकाचे मागील काही दिवसापासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. अनेक वृत्तपत्र प्रतिनिधींनी आवाज उठविल्यानंतर एस टी महामंडळाने बस स्थानकाची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र बस स्थानकातील इतर कक्षांवर या दुरुस्ती कामाचा परिणाम होताना दिसत आहे.
माणगांव बस-स्थानकात व्यापारी गाळे, वाहतूक नियंत्रक कक्ष, आरक्षण व विद्यार्थी पास विभाग व एस टी पार्सल विभाग असे कक्ष आहेत.
२६ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास बस स्थानकातील पार्सल विभाग कार्यालयातील काँक्रीट स्लॅबचा मलबा कोसळला यामध्ये कार्यालयातील कर्मचारी अक्षय नवघरे व अजय गायकवाड यांचा अपघात होताना वाचला, मात्र कार्यालयातील संगणक, प्रिंटर टेबल यांचे नुकसान झाले आहे. बसस्थानकाचे काम सुरू असल्याने फलाटांच्या वर असणारा स्लॅब ब्रेकर ने फोडण्याचे काम सुरू आहे त्यामुळे इतर विभागातील स्लॅबला हादरे बसून हे स्लॅब कोसळत आहेत. विशेष म्हणजे एवढी दयनीय अवस्था असताना एस टी महामंडळाने वाहतूक नियंत्रक कक्ष, पास व आरक्षण विभाग व पार्सल विभाग यांची तात्पुरती व्यवस्था का केली नाही? असा सवाल देखील संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
माणगाव पार्सल ऑफिस चा स्लॅब कोसळला ही माहिती कार्यलय चालक इंद्रनील पाटील यांनी आगार व्यवस्थापकांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली. त्यावेळी इंद्रनील पाटील यांनी झालेल्या वित्तीय नुकसानीची एस टी महामंडळाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
माणगांव बसस्थानकाची इमारत पूर्णतः धोकादायक झाली आहे असे असूनदेखील केवळ पत्राशेड टाकणे हा महामंडळाचा ढिसाळ कारभार असल्याचे व एखादा प्रवासी किंवा कर्मचाऱ्याचा जीव गेल्यानंतर एसटी महामंडळाला जाग येईल का? असे देखील नागरिकांकडून बोलले जात आहे आणि या कामाच्या वेळी इतर कक्ष तात्पुरते विस्थापित न केल्यास वाहतूक नियंत्रक कक्षात देखील ही परिस्थिती उद्भवू शकते हे सत्य नाकारता येणार नाही!