मावळा प्रतिष्ठान धनगर आळी... भले शाब्बास...
अभिमान वाटावा अशी कामगिरी..!
मुलांवर जबाबदारी टाकल्यास, मुले समाजालाच कसा आधार देतात याचे उत्तम उदाहरण !
रोहा (प्रतिनिधी) : महाडमध्ये आलेल्या प्रलयानंतर पुरग्रस्त बाधितांना प्रचंड घाणीला सामोरे जावे लागत आहे. प्रचंड चिखल, फुटलेल्या काचा आणि दूर्गंधीची पर्वा न करता रोह्यातील राजेश काफरे, अदित्य कोंढाळकर आणि धनगर आळीतील ५० मावळ्यांनी महाड मधील शिवाजी चौक, चवदार तळे आणि एम जी रोडवरील खाटीक गल्ली श्रमदानाने स्वच्छ केली.
खाटीक गल्लीमध्ये सुकी मासळी आणि कोंबड्यांची गोडाऊन असल्यामुळे तिथे आधी स्वच्छता व्हावी अशी स्थानिकांची मागणी होती. मात्र गल्ली अरुंद असल्याने जेसीबी किंवा तत्सम कुठलेही मशीन तिथे जाणे अशक्य होते.
रोह्याच्या मावळ्यांनी हे शिवधनुष्य उचललायचे ठरवले आणि लिलया पेलले. हातगाड्या, घमेली, फावडे इत्यादी साहित्य घेऊन तयारीत आलेल्या या मुलांनी दिवसभरात संपूर्ण गल्ली स्वच्छ केली.
स्थानिक रहिवाशांनी या मुलांशी संवाद साधताना या मुलांच्या रुपात देवदूतच मदतीला धावून आले अशा भावना व्यक्त केल्या.
महाड मध्ये स्वच्छतेसाठी आलेल्या बृहन्मुंबई मनपा आणि नवीमुंबई मनपा च्या सफाई कर्मचाऱ्यांनी सुद्धा या मुलांचे विशेष कौतुक केले.