महाड पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महिला पोहोचल्या तहसील कार्यालयात
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तहसील कार्यालयात महाड पूरग्रस्तांना वस्तू रूपात मदतीचा ओघ सुरू आहे. माणगांवच्या तहसीलदार प्रियांका आयरे-कांबळे, नायब तहसीलदार श्री. भाबड, प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील अधिकारी वर्ग व कर्मचारी यांनी पुरग्रस्तांसाठी उघडलेल्या दालनात वस्तूंचे वर्गीकरण करून त्यांचे पॅकेज बनविण्यास सुरुवात केली.
हे पॅकेज पुरग्रस्तांपर्यंत वेळेत पोहोचणे महत्वाचे होते म्हणून कामात गती येण्यासाठी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या महिलांनी पॅकेज बनविण्याचे महत्वाचे काम केले. त्यामुळे पूरग्रस्तांना वेळेत पॅकेज पोहोचविण्यास फार मोठी मदत झाली. त्यामुळे ज्या पूरग्रस्त महिलांची चूल पुरामुळे विझली त्यांची चूल पेटविण्यासाठी आपल्या घरातील चूल बंद ठेऊन या महिलांनी आपला बहुमूल्य वेळ तहसिल कार्यालयात जाऊन वस्तूंचे पॅकिंग करण्यात घालविला व मदतीच्या कामात आम्हीही मागे नाहीत हे दाखवून दिले.
या महिलांनी दाखविलेला हा आदर्श कायम समरणात रहावा असाच आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या महिलांचे नेतृत्व स्वयंसहायता महिला बचत गट माणगांवच्या अध्यक्षा देविका पाबेकर यांनी केले.