ओमकार भजनी मंडळ माणगांव-खांदाड यांचा महाड पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा!
माणगांव (उत्तम तांबे) : रायगड जिल्ह्यात गेले पाच दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहर हे डोंगर पायथ्याच्या सखोल भागात वसलेले असल्यामुळे सावित्री नदीच्या पुराचे पाणी महाड शहरात शिरले आणि होत्याचे नव्हते झाले. हे पुराचे पाणी १० ते १५ फूट असल्याने अन्नधान्य पुरात वाहून गेले एवढी पाण्याची उंची दोन दिवस असल्याने या पूरग्रस्त नागरिकांना छतावरील पाणी पिऊन दिवस काढावे लागले. अन्नधान्य बरोबर महाडकर नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले.
महाड तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात अंतर्गत माणगाव खांदाड ओमकार भजनी मंडळ व महिला मंडळ या सेवाभावी मंडळातर्फे जीवनावश्यक विविध वस्तूंचे दहा किलो वजनाचे असे दीडशे पॅकेज महाड पूरग्रस्त भागात वाटप करण्यात आले. मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्यानंतर महाड शहरात तील दोन दिवसाने पुराचे पाणी ओसरले होते मात्र येथील परिस्थिती पूर्णतः चिखलमय झाली होती.
प्रत्येकाच्या घरातील दैनंदिन वस्तूंची मोडतोड होऊन अन्नधान्य कुजून गेले होते. जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून जाऊन लाखोचे नुकसान झाले येथे साचलेल्या कचऱ्यामुळे व दूषित अन्नामुळे महाड शहरात दुर्गंधी पसरल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून आले. महाडच्या जलप्रलया बरोबर या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यामधील तळीये गावावर दरड कोसळून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या दरडीखाली गारद होऊन 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
काळीज पिळवटून टाकणाऱ्या या भयानक घटनेमुळे ओमकार भजनी मंडळ व महिला मंडळ मागे राहिले नाही एक हात मदतीचा अंतर्गत या मंडळाने आर्थिक बाब उभारून किराणा सामान म्हणून तांदूळ, गहू, तूरडाळ, साखर, चहापावडर, जेमिनी तेल, कडधान्य, कांदे बटाटे, विविधमसाले, मीठ, मच्छर अगरबत्ती, मेणबत्ती, मॅचेस, बिस्किट अशा विवीध वस्तूंचे दहा किलो वजनाचे एक पॅकेट असे दीडशे पॅकेट या पूरग्रस्त विभागात या ओमकार भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाटप केले. कर्तव्याच्या जाणीवेतून मदतीचा हात दिल्याने मंडळाने समाधान व्यक्त केले तसेच मंडळाचे पूरग्रस्त नागरिकांनी नम्रतेने आभार व्यक्त केले तसेच या महाड पूरग्रस्त नागरिकांसाठी रायगड जिल्हा पोलीस दलाबरोबर जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्थाने विविध मार्गाने मदतीचा हात म्हणून मोठे सहकार्य केले आहे.