आंबेवाडी जिल्हा परिषद गण राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेस आढावा बैठक संपन्न
रोहा (रविना मालुसरे) : खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या सूचनेनुसार रोहा तालुका महिला व युवती काँग्रेसच्या आढावा बैठका तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. दिनांक २ जुलै २०२१ रोजी रोहा तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा प्रितमताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेश महाबळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी पुढे येऊन राजकीय सामाजिक कार्यात सक्रिय होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रितमताई पाटील यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राजकारणातही सुप्रियाताई सुळे, आदितीताई तटकरे यांचा आदर्श ठेवून आपणही काम करू. राष्ट्रवादी महिला व युवती संघटन वाढवून आपल्या पक्षाला बळकटी देण्याचे अवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.
यावेळी उपस्थित अनेक महिलांनी मनमोकळेपणाने पक्ष संघटनेबाबत आपली मतं मांडली.आढावा बैठकीसाठी रोहा तालुका अध्यक्ष प्रितमताई पाटील, आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेश महाबळे, उपसरपंच श्रीकांत चव्हाण, पंचायत समिती सदस्या सिद्धी राजिवले, कुमार लोखंडे, जगन्नाथ धनावडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रविना मालुसरे, आंबेवाडी गणातील सरपंच,उपसरपंच, सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.