निवी ग्रामस्थ मंडळ आणि नवतरूण मंडळातर्फे महाड येथील दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात
रोहा (प्रतिनिधी) : रोहा तालुक्यातील निवी येथील ग्रामस्थ मंडळ आणि नवतरूण मंडळ निवी यांनी महाड येथील दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुसळधार पावसामुळे महापुराची परीस्थिती निर्माण झाली होती. या महापुरामुळे महाड शहर व ग्रामीण भाग पुर्णपणे पाण्याखाली गेला. पावसाने विश्रांती घेतल्याने आता पुराचे पाणी ओसरण्यात सुरुवात झाली आहे. येथील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, निवी येथील ग्रामस्थ मंडळ आणि नवतरूण मंडळाने येथील दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात दिला. त्यामध्ये पाणी बिस्लेरी बॉटल्स, साड्या, अन्नधान्य यांसह जीवनावश्यक वस्तू पिकअप टेंपो भरून महाड येथे दुर्घटनाग्रस्तांसाठी पाठविण्यात आला. तसेच तेथील परिसराच्या स्वच्छतेसाठीही फावडा, घमेली यांसारखी स्वच्छतेची अवजारे घेऊन येथील ग्रामस्थांनी आणि तरूणांनी पुढाकार घेतल्याची माहिती निवी येथील काशिनाथ बामुगडे यांनी दिली.