क्लॅरियंट कंपनीकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसला 'केराची टोपली'
केमिकलयुक्त दुषित पाण्यामुळे भातशेती उध्वस्त हेण्याच्या मार्गावर!
रोहा (समीर बामुगडे) : प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्यांविरूद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जरी कारवाईचा इशारा देणारी नोटीस बजावली असली तरी या नोटीसीला क्लॅरियंट कंपनीकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचे दिसून येत आहे. कारण या कंपनीचे केमिकलयुक्त दुषित पाण्यामुळे या परिसरातील भातशेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली असून या समस्येमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या कंपनीविरूद्ध तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
या परिसरात रोठ खूर्द गावाची शेती व लोकवस्ती असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये क्लॅरियंट कंपनीकडून दुषित सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे जीवनमान धोक्यात आलेले आहे. प्रशासनाने पण या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप असून कंपनीची "दुषित कार्यपद्धत" संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कंपनीविरूद्ध तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.