रोहा बाजारपेठेत भीषण अपघात, खड्ड्याने घेतला जीव
पिकअप गाडी अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!
रोहा (रविना मालुसरे) : आज सकाळी साडे अकराच्या सुमारास दुचाकीस्वार संदीप जंगम, वय वर्षे ५२, रा. भुवनेश्वर-रोहा हे काही कामानिमित्त रोह्यातील बाजारपेठेत गेले असता रायकर पार्क समोरील एका खड्ड्यात गाडीचा तोल जाऊन खाली पडले. त्याचवेळेस पाठीमागून आलेल्या पिकअप टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली. विटाने भरलेला हा पिकअप टेम्पो (MH04 DS 8012) त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.
घटनास्थळावरुन पिकअपच्या ड्रायव्हरने पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच रोहा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक श्री. नामदेव बंडगर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी तत्परतेने हजर झाले. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा उपरुग्णालय रोहा येथे पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. पुढील तपास रोहा पोलीस करीत आहेत.
रोह्यातील खराब व खड्डेमय रस्ते हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नव्याने काँक्रिटिकरण करण्यात आलेल्या रोहा -मुरुड रस्त्यावर तहसिल कार्यालयापुढे विजेचे पोल हे रस्त्याच्या कडेला खेटून उभे आहेत. तिथेही मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. प्रशासनाला जाग येणार तरी कधी? असा संतप्त सवाल रोहेकर नागरिक विचारित आहेत.